सातारा- सामाजिक कार्यकर्ते व पुरोगामी विचाराचे खंदे समर्थक कॉ.चंदुलाल रसूल शेख ( वय ९१) यांचे बुधवारी निधन झाले. आचार्य अत्रे यांच्या गाडीचे चालक म्हणून कॉ.शेख यांनी काम केले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि चंदुलाल शेख यांनी एका खोलीत काही काळ वास्तव्य केले होते.
हेही वाचा-फडणवीसच कंगणा आणि राम कदमांचे बोलविते धनी; सचिन सावंतांची टीका
कॉ.चंदुलाल शेख यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्या समवेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहिरीच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवला होता. तसेच कॉ. चंदुलाल शेख यांनी काही कवनेही लिहिली आहेत. चित्रतपस्वी व्ही. शांताराम, कैफी आझमी, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासमवेतही त्यांनी काम केले होते.
मुंबई सोडल्यानंतर शेख यांनी सातारा येथे एस.टी महामंडळात चालकाची नोकरी स्वीकारली. इंटक या कामगार संघटनेत त्यांनी काम केले. एसटीतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी कॉम्रेड व्ही. एन. पाटील व कॉम्रेड बळवंत गोहाड यांच्या नेतृत्वाखाली सातारच्या लाल बावटा युनियनच्या कार्यात सहभाग घेतला. ते सातत्याने डाव्या व पुरोगामी चळवळी बरोबर सक्रिय राहिले. वयाच्या पन्नाशीनंतर ते अरेबिक भाषा शिकले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.