सातारा - लग्नाचा मुहूर्त अगदी समीप आला होता. वधू-वरांवर अक्षता टाकण्याचीच वेळ आली होती. तेवढ्यात लग्न मंडपात पोलीस पोहोचले आणि विवाह रोखण्यात आला. कारण, वधू अल्पवयीन होती. 16 व्या वर्षी मुलीचे लग्न होत असल्याच्या माहितीवरुन कराड ग्रामीण पोलीस ठाण्यातील निर्भया पथकाने तातडीने लग्नस्थळी धाव घेऊन हा बालविवाह रोखला. तसेच दोन्ही बाजूच्या लोकांचे जबाब नोंदवून घेत त्यांना समज दिली. ही घटना कराड तालुक्यातील रेठरे या गावात घडली आहे.
रेठरे (ता. कराड) येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह सोलापूर जिल्ह्यातील मुलाशी ठरला होता. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरिक्षक दीपज्योती पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांना माहिती दिली. डीवायएसपी गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दीपज्योती पाटील यांनी हवालदार अतुल देशमुख यांच्यासमवेत मुलीच्या वयाची खात्रीलायक माहिती घेतली. मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री पटल्यानंतर निर्भया पथक विवाहस्थळी दाखल झाले. कुटूंबियाकडे मुलीच्या वयाबाबत चौकशी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मुलीचे वय पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असा जबाब नोंदवून घेऊन समज देण्यात आली.