सातारा - येथील छत्रपती राजघराण्याच्या स्नुषा चंद्रलेखाराजे शिवाजीराजे भोसले यांचे आज (दि. 13 सप्टें.) दुपारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.
साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांच्या त्या पत्नी होत. तर खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांच्या त्या काकी होत. सातारा शहरात लोक त्यांना 'काकी' या आपुलकीच्या नावाने संबोधत होते. काही महिन्यांपूर्वी त्या अदालत वाड्यातील आपल्या निवासस्थानी घसरून पडल्या होत्या. पुणे येथील रुग्णालयात अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात देखील उपचार करण्यात आले. आज दुपारी 'अदालतवाडा' या राजप्रासादात त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पती शिवाजीराजे भोसले, मुलगी वृषालीराजे पवार, नातू कौस्तुभराजे पवार आणि जावई असा परिवार आहे. सातारा शहरातील अनेक संस्थांच्या त्या मार्गदर्शक होत्या. असंख्य व्यक्तींना त्यांनी पाठबळ दिले. त्यांच्या जाण्यामुळे सातारा शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.