कराड(सातारा) - शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासह 80 धारकर्यांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बंडातात्या कराडकर यांच्या पायी वारीला जाण्याच्या समर्थनार्थ आणि शासनाने आषाढी पायी वारीला परवानगी नाकारल्याचा निषेध म्हणून संभाजी भिडेंसह धारकर्यांनी सोमवारी बेकायदा जमाव जमवून कराडमध्ये रॅली काढली होती. तसेच साईबाबा मंदिर उघडून मंदिरात प्रवेश केला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या निर्देश व आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भिडेंसह धारकर्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी भिडे यांच्यासह 80 धारकर्यांवर कराडमध्ये गुन्हा दाखल.. बंडातात्यांच्या कृतीचे समर्थन, स्थानबध्दतेचा निषेध..
पायी वारीसाठी जाण्याच्या बंडातात्या कराडकर यांच्या कृतीचे शिवप्रतिष्ठानने समर्थन केले. बंडातात्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्दल करण्याच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ संभाजी भिडे यांनी सोमवारी धारकर्यांसह कराडच्या दत्त चौकातून तहसील कार्यालय ते दत्त चौक अशी रॅली काढली. तसेच तहसीलदारांना निवेदन दिले. बेकायदा जमाव जमवून आणि कोरोनाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी हवालदार प्रशांत पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संभाजी भिडेंसह सागर आमले, अजय पावस्कर, केदार डोईफोडे, प्रवीण माने, गणेश कापसे, रणजित पाटील, सुदर्शन पाटसकर यांच्यासह 80 धारकर्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
साईबाबा मंदिरात केला प्रवेश..
आषाढी वारीसाठी पायी दिंडीने पंढरपूरला जाण्यास शासनाने परवानगी नाकारली आहे. तरीही बंडातात्या कराडकर यांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत आषाढी वारीसाठी जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्यांना कराड तालुक्यातील करवडी गावातील गोशाळेत स्थानबद्ध केले आहे. या निषेधार्थ संभाजी भिंडे आणि धारकर्यांनी सोमवारी कराडमधील साईबाबा मंदीर उघडून मंदीरात प्रवेश केला. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने तसेच विना मास्क दत्त चौक ते प्रशासकीय इमारतीपर्यंत घोषणाबाजी करत रॅली काढली होती. याविरोधात कराड शहर पोलिसांनी संभाजी भिडेंसह धारकर्यांवर गुन्हा दाखल केला आहे.