मुंबई -काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा या विधानसभा निवडणुका आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यावेळी आयोगाने सातारा लोकसभेची पोट निवडणूक जाहीर करण्याचे टाळले होते. मात्र, मंगळवारी अचानक आयोगाकडून या निवडणुकीची घोषणा करण्यात आल्याने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत. अनेक राजकीय विश्लेषक याचा संबंध थेट शरद पवार यांच्या साताऱ्यातील शक्ती प्रदर्शनासोबत जोडत आहेत.
हेही वाचा... सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, निवडणूक आयोगाची घोषणा
साताऱ्यात पवारांचे शक्ती प्रदर्शन आणि लोकसभेची पोटनिवडणूक
रविवारी शरद पवार यांनी साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. या रॅलीसाठी साताऱ्यातील हजारो युवक राष्ट्रवादीचे झेंडे, बॅनर घेवून महारॅलीत सहभागी झाले दोते. यामुळे सातार्यातील वातावरण राष्ट्रवादीमय झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, दोन्ही राजांच्या उपस्थितीत भाजपच्या संपन्न झालेल्या महाजनादेश यात्रेची राष्ट्रवादीने हवा काढल्याची चर्चा संपूर्ण साताऱ्यात सुरू झाली होती. यामुळे या घटनेनंतर आज मंगळवारी म्हणजे पवारांच्या रॅलीच्या तिसऱ्याच दिवशी साताऱ्यातील पोटनिवडणूक जाहीर होणे, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सातारा लोकसभेबाबत भाजपला शंका ?
सातारा पोटनिवडणुकीतून आपल्या निर्णयाला लोकांचे समर्थन आहे, हे सिद्ध होईल, असे उदयनराजेंकडून सांगण्यात आले होते. पण भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याअगोदरच महाराष्ट्रात विधानसभेसोबत साताऱ्यातील पोटनिवडणूक व्हावी. याशिवाय पोटनिवडणुकीत दगाफटका झाल्यास राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासनही उदयनराजे यांनी भाजप पक्षप्रवेशावेळी घेतले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राष्ट्रवादी सोडल्यास आपण येथून निवडून येण्याबाबत उदयनराजेंनाही शंका असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी शरद पावारांची साताऱ्यात झालेली महारॅली पाहता भाजपलाही ही जागा हातची जाण्याची भीती वाटत आहे. यामुळे विधानसभेसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घेतल्यास भाजपला हा धोका कमी होईल, या कारणास्तव ही पोटनिवडणूक आताच घेण्यात येत असावी, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.