सातारा - सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथे युवकाचा खून करून त्याचा मृतदेह जाळुन पुरावा नाहीसा करणाऱ्या ३ संशयितांना पकडण्यात पोलीसांना यश आले आहे. मृताची ओळख पटवून संशयितांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सहा तासात पोलिसांनी पूर्ण केली.
संशयित रविवार पेठेतील...
आकाश उर्फ रॉजर राजेंद्र शिवदास (रा. रामनगर, ता.जि. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे (वय 19), तेजस नंदकुमार आवळे (वय 19) व संग्राम बाबू रणपिसे (वय 28, तिघेही रा. रविवार पेठ सातारा) अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत.
आधी मृताची ओळख पटवली...
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी याबाबातची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले, "आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेत, खंडोबाचा माळ येथे एक जळालेल्या अवस्थेमधील मृतदेह पोलिसांना आढळला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रथमदर्शनी कोणत्यातरी अज्ञात इसमाचा खून करुन त्याचा मृतदेह जाळून पुरावा नाहीसा केल्याचे निदर्शनास आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील नागरिकांकडे विचारपूस करुन तसेच गोपनिय माहिती मिळवली. तेव्हा, मृत व्यक्ती आकाश राजेंद्र शिवदास (रा.रामनगर, ता.जि. सातारा) ची ओळख पटली.
हे आलं कारण पुढे....
या मृताचे कोणाशी वैर अथवा भांडणतंटे आहेत काय याची माहिती घेवून ३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत मृत आकाश उर्फ रॉजर राजेंद्र शिवदास हा विक्रांत उर्फ मन्या उमेश कांबळे याच्या बहिणीला त्रास देत होता. या कारणावरुन चिडून त्यास काल मध्यरात्री खंडोबाचा माळ येथे डोक्यात दगड टाकुन त्याचा खुन केला. त्याचा मृतदेह जाळून टाकला असल्याची कबुली संशयितांनी दिली.
गुन्हा ३ तासात उघडकीस...
गुन्हयाच्या तपासात जळालेला मृतदेह पुरुष की स्त्री याबाबत खात्री होत नसताना तसेच कोणताही पुरावा नसताना कमी वेळात मयताची ओळख पटवली. गोपनीय बातमीदारांच्या आधारे संशयीतांना ताब्यात घेऊन क्लिष्ट गुन्हा ३ तासात उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री. बन्सल यांनी सहभागी स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले.