सातारा- कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे राज्यपालांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची विनंती माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. निंबाळकर यांनी मंगळवारी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना एक निवेदनही दिले.
कोरोना रुग्णांच्या संदर्भात हॉस्पिटलमध्ये असणारी दुरावस्था, मोलमजुरांचा प्रश्न, रेशन वाटप, व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रक्रिया याबाबतीत सरकार आणि प्रशासन यांच्यात कसलाही समन्वय नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकमेकांच्या विरोधामध्ये निर्णय घेताना दिसत आहेत. बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. यावर राज्य सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. कोरोना रुग्णांच्या किती चाचण्या झाल्या याबाबत राज्य सरकार वस्तुस्थिती लपवत असल्याचा आरोप, निंबाळकर यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.