सातारा -महाराष्ट्रात अजून समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील बेंदूर सणावर दुष्काळाचे सावट आले आहे. उद्यावरती येऊन ठेपलेल्या बैल पोळा (बेंदूर) सणाच्या लगबगीने बळीराजाचे अंतकरण भरुन आले आहे. हिरव्यागार शेताच्या बांधावरती दिमाखात उभी असणारी बैल जोडी आज ओस माळरानावरती छावणीच्या आधाराने चाऱ्यासाठी हंबरडा फोडताना दिसत आहेत. अशा दयनीय परिस्थितीत गोड पुरण पोळी खाऊन बळीराजाने बेंदूर सण साजरा करायचा तरी कसा? या विवंचनेने जिल्ह्यातील बळीराजाचे डोळे पाणावले आहेत.
ना नागरणी, ना कुळवणी, ना पेरणी, ना खुरपणी, खायला अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही आणि जनावरांना चारा नाही. काम करुन जगायचे म्हटले तरी हाताला काम नाही, अशी भीषण दुष्काळ परिस्थिती निसर्गाच्या अकृपेमुळे माणदेशी माणसाच्या नशिबी आल्यामुळे अनेक लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करावे लागले आहे. कृषीप्रधान भारत देशातील विविध राज्यातील शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गोठ्यातील बैलजोडी आणि पोटची लेकरं बळीराजाला सारखीच असतात. दरवर्षी पेरणीच्या धांदलीतून मोकळे झाल्यानंतर बळीराजा आषाढ महिन्यात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.