सातारा: अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हैदराबादमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या ( Tata Institute in Hyderabad ) बलून फॅसिलिटीमधून वैज्ञानिक संशोधनासाठी अवकाशात १० बलून फ्लाईटस् सोडण्यात येणार ( 10 balloon flights launched into space ) आहेत. वैज्ञानिक उपकरणे असलेले हे बलून मोठ्या रंगीत पॅराशुटसह औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, अहमदनगर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जमिनीवर येण्याची शक्यता आहे. अशी उपकरणे आढळून आल्यास उपकरणांना स्पर्श अथवा छेडछाड न करता स्थानिक प्रशासनाला कळविण्याचे आवाहन साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी केले आहे.
हायड्रोजन फुगे ४२ किमी उंची गाठणार: हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या बलून फॅसिलिटीमधून दि. १ नोव्हेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत सोडले जाणारे हे फुगे पातळ (पॉलीथिलीन) प्लास्टिक फिल्म्सपासून बनवलेले आहेत. ५० ते ८५ मीटर व्यासाचे फुगे हायड्रोजन वायूने भरलेले असतात. संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे वाहून नेणारे हे फुगे ३० ते ४२ किमी दरम्यान उंची गाठण्याची अपेक्षा आहे. काही तासांच्या कालावधीनंतर ही उपकरणे मोठ्या रंगीत पॅराशूटसह जमिनीवर खाली येतात.