सातारा- कराडमध्ये नगरपालिकेने एलईडी पथदिवे बसविले आहेत. हे पथदिवे एकाचवेळी बंद आणि चालू करणारी सीसीएएस ही यंत्रणाही बसवण्यात आली आहे. यामुळे पथदिवे एकाचवेळी बंद-चालू करता येणार आहेत. वीज आणि खर्चातही बचत होणार असल्याची माहिती नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी दिली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते रविवारी शाहू चौकात या यंत्रणेचे उद्घाटन झाले.
हेही वाचा -कराड शहरावर राहणार 125 सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर, नगरपालिकेचा निर्णय
सध्या वापरात असलेल्या ऊर्जेच्या उपकरणांची कार्यक्षमता कमी असल्याने विजेचा अपव्यय होत होता. ऊर्जेच्या कार्यक्षम वापरांचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत आहे. वीज बचत हा ऊर्जेचा कायमस्वरूपी स्त्रोत म्हणून अस्तित्वात राहणार आहे. ऊर्जा संवर्धन कायदा, 2001 च्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर स्थापीत ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (बी.इ.इ), नवी दिल्ली यांच्या अहवालानुसार सर्व क्षेत्रात 20 ते 30 टक्के ऊर्जा बचतीस वाव आहे. राज्य सरकारने ऊर्जा संवर्धन धोरणानुसार पथदिवे बसवताना फक्त एलईडी पथदिवे बसविणे बंधनकारक केले आहे.
कराड शहरात ईईएसएलच्या माध्यमातून एस्को (ESCO - Energy service Company) तत्वावर एलईडी पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याबरोबरच कराड शहरातील सर्व स्ट्रीट लाईट एकाच वेळी चालू व एका वेळी बंद होणारी सीसीएमएस (Centralized control and monitoring system) यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.