सातारा - येथील राजवाड्यासमोर मंगळवारी (दि. 23 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास एकावर कोयत्याने प्राणघातक करण्यात आला असून यात ती व्यक्ती जखमी झाली आहे. सुधीर किसन देसाई (वय 47 वर्षे, रा. पुनवडी, ता. सातारा), असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी पाहणी करताना पोलीस पथक भर दुपारी घडला प्रकार
याबाबत जखमी सुधीर देसाई यांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ते राजवाड्यासमोर, प्रतापसिंह उद्यानालगत असलेल्या टाईपरायटींगच्या सेंटरवर काही कामानिमित्त गेले होते. त्यावेळी अनोळखी दोघेजण तेथे आले. या दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये सुधीर देसाई यांच्या पायाला जखम झाली आहे.
तक्रार केल्याच्या रागातून हल्ला
या हल्ल्याची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी आले. त्यांनी देसाई यांना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलीस जखमी सुधीर देसाई यांचा जबाब घेत होते. त्यामुळे पोलिसांत गुन्हा नोंद झाला नव्हता. मात्र, या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयातील चौकीत झाली आहे. सुधीर देसाई यांनी सांगितले की, माझ्या शेतात बेकायदा गौण खनिज उत्खनन केले जात होते. याबाबत मी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. या तक्रारींच्या कारणातूनच माझ्यावर कोयत्याने हल्ला झाला असावा.
अधिकाऱ्यांची धाव
घटनास्थळी अतिरीक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट देऊन पहाणी केली. तसेच तपासाच्या अनुशंगाने अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा -साताऱ्यामधील दहिवडी प्रतिबंधित क्षेत्र घोषित; आढळले ७१ बाधित रुग्ण