सातारा :आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड पोटनिवडणूक घेण्यात आली. यात त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा मोठ्या मताधिक्क्यांनी विजय झाला. अश्विनी जगताप यांच्या विजयानंतर त्यांचे माहेर असलेल्या सातारच्या कराड तालुक्यातील सुपने गावात ग्रामस्थांना भरपूर आनंद झाला आहे. त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर गावभर झळकले आहेत. त्यांच्या या यशाचा माहेरच्या लोकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. सुपने गावची कन्या अश्विनी जगताप आमदार झाल्याबद्दल ग्रामस्थांनी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
माहेरमधूनही सुरू होता प्रचार :चिंचवडची पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील चिंचवडस्थित मतदारांची यादी काढण्यात आली होती. त्या मतदारांशी अश्विनी जगताप यांचे भाचे गाठीभेटी घेऊन मतदानाचे आवाहन करत होते. त्यामुळे या विजयात माहेरचेही योगदान पाहायला मिळत आहे. त्यांच्या विजयीसाठई सुपाने गावातून ही प्रचंड मेहनत करावी लागली होती.
माहेरी राजकीय वारसा नाही :अश्विनी जगताप यांच्या माहेरच्या कुटुंबाला फार मोठा राजकीय वारसा नाही. मात्र, स्थानिक राजकारणात माहेरच्या कुटुंबातील तरूण पिढीचा लौकीक आहे. त्यांचे भाचे आकाश जाधव हे युवा संघटक आहेत. कराड मर्चंट पतसंस्थेचे संचालक तसेच क्रशर आणि वीटभट्टी व्यावसायिक आहेत. अश्विनी जगताप यांचा लक्ष्मणराव जगताप यांच्याशी तीस वर्षांपूर्वी विवाह झाला. लक्ष्मण भाऊ आमदार झाल्यानंतर माहेरच्या कुटुंबाला देखील स्थानिक राजकारणात प्रतिष्ठा मिळाली.