मुंबई -ब्रिटीशांनी सुमारे दिडशे वर्ष भारतावर राज्य केले. त्याकाळात संपूर्ण देशवासीयांना गुलामगिरीची वागणूक देण्यात आली. त्याच ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रत्येक भारतीय आतूर झाला होता. त्याच वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी 'करो या मरो' या मंत्राचा नारा दिला ( Karo Ya Maro ). आणि स्वातंत्र्याच्या अंतिम संघर्षाची ठिणगी भारतभर पेटली. संपूर्ण आयुष्य अहिंसेवर अमल राखणाऱ्या गांधींनीच'करो या मरो'चा मंत्र दिल्याने प्रत्येक भारतीयामध्ये एक उत्साह संचारला होता. कोट्यवधी भारतीय त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरले ( Crores of Indians came on streets ).ऑगस्ट क्रांती ( August Kranti ) हे असे व्यापक जनआंदोलन होते ज्याने ब्रिटिशांच्या सत्तेला हादरा दिला ( Movement to end British rule ).
दुसऱ्या महायुद्धामुळे स्वातंत्र्य लढ्याला बळ -भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी ही नेहमी 1942 सालच्या आधीच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडली जाते. पण खऱ्या अर्थाने- भारत छोडो आंदेलनाची भावना दुसऱ्या महायुद्धामुळे निर्माण झाली. त्याकाळात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या लढ्याला मोठे बळ मिळाले. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि जग दोन गटात विभागले गेले. अमेरिका, ब्रिटनच्या नेतृत्वाखालील दोस्त राष्ट्र आणि जर्मनी, जपानच्या नेतृत्वाखालील अक्ष राष्ट्र. आग्नेय आशियात ब्रिटिशांचा जपानच्या सैन्याने पराभव केला आणि सिंगापूर, मलाया आणि बर्मा म्हणजे आजचे म्यानमार जिंकून भारताच्या सीमेपर्यंत मुसंडी मारली. आता जपान कधीही भारतावर हल्ला करणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भारतातही ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याची लढाई सुरु होती. अशा परिस्थितीत दोस्त राष्ट्रांसाठी भारताचा पाठिंबा हा अत्यंत महत्वाचा होता. त्यामुळे अमेरिका आणि फ्रान्सने ब्रिटनवर दबाव टाकायला सुरुवात केली. भारतीय गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीय नेत्यांना न विचारता 3 सप्टेंबर 1939 साली भारत जर्मनीविरोधात या युद्धात सामिल होत असल्याची घोषणा केली. काँग्रेसमध्ये या युद्धात ब्रिटिशांना पाठिंबा देण्यावरुन मतभेद होते. ब्रिटनला कोणत्याही परिस्थितीत भारताची साथ आवश्यक होती. पण या युद्धानंतर भारताला काय मिळणार यावर ब्रिटिशांनी चर्चा करावी अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली होती.
शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या -ब्रिटिशांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली मार्च 1942 मध्ये 'क्रिप्स मिशन' भारतात पाठवले होते. क्रिप्स मिशनने भारताला पूर्ण स्वराज्य नाकारुन डॉमिनियन स्टेटस देण्याचा प्रस्ताव मांडला होता. म्हणजेच देश भारतीयांनीच चालवायचा पण त्यांच्या संपूर्ण कारभारावर ब्रिटीश लक्ष ठेवणार. त्यांच्या निर्णयावरूनच भारताचा कारभार भारतीय पाहणार. असा एकूम तो प्रस्ताव होता. भारतीयांनी हा प्रस्ताव ओळखून तो नाकारला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांकडून भारतीय स्त्रोतांचं शोषण करण्यात आले. युद्धाच्या खर्चासाठी बंगाल प्रांतातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या होत्या. भारतीयांचे शोषण सुरु होते. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष उफाळून आला होता. ब्रिटीशांच्या साम्राज्यवादावर आता अंतिम प्रहार करण्याची वेळ आली होती. सुरुवातीला 'भारत छोडो' आंदोलन सुरु करायचे का नाही यावर अनेक वाद झाले. महात्मा गांधी या आंदोलनाच्या समर्थनार्थ होते तर जवाहरलाल नेहरू, राजगोपालाचारी, मौलाना आझाद आणि इतर डाव्या विचारांच्या नेत्यांना अशा परिस्थितीत आंदोलन करणे महत्वाचे वाटत नव्हते. पण गांधींनी हे आंदोलन सुरु करायचेच असा निर्धार केला होता. त्याला सर्व नेत्यांना समर्थन दिले होते.
ठिकठिकाणी बैठका-चर्चांचे सत्र -वर्ध्यामध्ये 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारणी समितीची बैठक झाली. त्यामध्ये 'भारत छोडो' चा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर 1 ऑगस्ट 1942 रोजी अलाहाबादमध्ये टिळक दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळीही यावर चर्चा करण्यात आली. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानात राष्ट्रीय काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत ऐतिहासिक 'भारत छोडो'चा प्रस्ताव पारित करण्यात आला. देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांची एकच मागणी होती, ती म्हणजे 'पूर्ण स्वराज्य'.