सातारा- राज्यात भाजप आणि शिवसेनेत युती झाली आहे. मात्र, या युतीमुळे काही ठिकाणी शिवसेनेच्या हक्काच्या मतदारसंघांतील उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे बंडखोरीचे प्रमाण वाढणार आहे. सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघातही युतीत बिघाडी झाली आहे.
एकीकडे राज्यात भाजप आणि सेना एकत्र लढत असताना माण-खटाव मतदारसंघात मात्र, भाजप आणि शिवसेना यांनी एकमेकांच्या विरोधात शड्डु ठोकला आहे. वास्तविक बघता हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मदतीने माजी आमदार जयकुमार गोरे यांनी हा मतदारसंघ भाजपकडे खेचुन घेतला. त्यामुळे शिवसेना नेते शेखर गोरे चांगलेच संतप्त झाले आहेत. तर भाजपचे माजी आमदार दिलीपराव यळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी देखील वेगळी चूल मांडली आहे. अचानकपणे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार जयकुमार गोरे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.