महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जावळी खोऱ्यात महावितरणची परिस्थितीशी झुंज; प्रतापगडासह 16 दुर्गम गावे प्रकाशात - जावळी न्यूज

पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील जावळी खोऱ्यातील (महाबळेश्वर तालुका) घनदाट जंगल व दऱ्याखोऱ्यांतील वीजयंत्रणा जमीनदोस्त झाली होती. ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी चार दिवस यशस्वी झुंज देत यश मिळवले.

After the efforts of MSEDCL, power supply to 16 villages in Jawali valley started
जावळी खोऱ्यात महावितरणची परिस्थितीशी झुंज; प्रतापगडासह 16 दुर्गम गावे प्रकाशात

By

Published : Jul 6, 2020, 6:42 PM IST

सातारा - पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील जावळी खोऱ्यातील (महाबळेश्वर तालुका) घनदाट जंगल व दऱ्याखोऱ्यांतील वीजयंत्रणा जमीनदोस्त झाली होती. ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी चार दिवस यशस्वी झुंज देत यश मिळवले. या प्रयत्नांमुळे सातारा जिल्ह्यातील प्रतापगडसह अतिदुर्गम 16 गावे (ता. महाबळेश्वर) प्रकाशमान झाली.

महाबळेश्वर येथील महावितरणच्या वेण्णालेक उपकेंद्रातून उच्चदाब 22 केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीद्वारे सह्याद्री डोंगररांगेत असलेल्या अतिदुर्गम जावळी खोऱ्यातील गावांना वीजपुरवठा केला जातो. प्रतापगड, मेटतळे, वाडा कुंभरोशी, शिरवली, कासरूड, हातलोट, बिरवाडी, डिरमणी, जावळी, दुधोशी, फरोशी, पारसोंड, प्रतापगड आदी 16 गावांतील सुमारे 1 हजार 250 वीजग्राहक आहेत. सुमारे 70 किलोमीटर लांबीची ही वीजवाहिनी जावळी खोऱ्यातील दऱ्या व किर्र अरण्यामधून गेलेली आहे. महाबळेश्वरपासून निघालेल्या या वाहिनीचे शेवटचे टोक प्रतापगडावर आहे.

जावळी खोऱ्यात महावितरणची परिस्थितीशी झुंज; प्रतापगडासह 16 दुर्गम गावे प्रकाशात
पावसाळी वाऱ्याच्या तडाख्याने विविध ठिकाणी मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने या उच्चदाब वीजवाहिनीचे 8 वीजखांब तसेच अडीच किलोमीटर वीजतारा जमीनदोस्त झाल्या होत्या. तसेच वाहिनीशी संलग्न 26 लघुदाबाचे वीजखांब कोसळले. त्यामुळे वाडा कुंभरोशी, मेटतळे, प्रतापगडसह 16 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. वादळाचा प्रथमच असा तडाखा बसला. महाबळेश्वर तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र, दुसऱ्या दिवशी तालुक्यात तब्बल सरासरी 162 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे महावितरणला वीजयंत्रणा दुरुस्तीचे काम दुसऱ्या दिवशीही सुरु करता आले नाही. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी महाबळेश्वर, पाचगणी तसेच प्रतापगडसह 16 गावांचा वीजपुरवठा लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याप्रमाणे वाईचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांनी या भागात भेटी देऊन वीजयंत्रणेच्या उभारणीच्या कामाला सुरवात केली.
जावळी खोऱ्यात महावितरणची परिस्थितीशी झुंज; प्रतापगडासह 16 दुर्गम गावे प्रकाशात
अतिशय घनदाट जंगलात दोन ठिकाणी खांब कोसळले होते. त्या जागेवर नवीन वीजखांब नेणे जिकरीचे व अतिशय मुश्कील होते. वनविभागाची परवानगी घेऊन मेटतळे, कुंभरोशी, जावळी या गावांतील ग्रामस्थांच्या मदतीने नवीन दोन वीजखांब नेण्यात आले. यासह मेटतळे परिसरातील आणखी तीन वीजखांब व वीजतारांची यंत्रणा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. दुसरीकडे दुधोशीजवळ अत्यंत खोल दरीमधील तीन वीजखांब पडल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. मात्र, तेथेही नवीन वीजखांब रोवण्याचे व वीजतारा ओढण्याचे काम सुरु करण्यात आले.डोंगरदऱ्यांच्या निसरड्या वाटा, चिखल व पावसाची रिपरिप, ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश नाही. सर्वदूर धुके अशा स्थितीत काम करताना तोल गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, हे सर्व धोके दूर ठेऊन महावितरणचे जिगरबाज उपकार्यकारी अभियंता चेन्नास्वामी रेड्डी, सहाय्यक अभियंता सनी पवार, अमोल गिरमे (वाई), बाळासाहेब चोरमले तसेच जनमित्र नितीन मोरे, लखन नावीलकर, अमित मोरे, रमेश मोरे, दिनेश जाधव, मयूर गायकवाड यांच्यासह कंत्राटदारांचे 15 कर्मचारी व सुमारे 40 ग्रामस्थ यांनी सलग चार दिवस वीजयंत्रणा उभारण्याचे काम केले. दररोज सकाळी साडेसात ते रात्री वाहन किंवा मोबाईलच्या प्रकाशझोतात साडेआठपर्यंत अविश्रांत काम सुरु होते.साताऱ्याचे प्रभारी अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने यांनी नवीन वीजखांब, इतर साहित्य पाठविण्याचे तत्परतेने काम केले. तर वाडा कुंभरोशीच्या ग्रामस्थांनी महावितरणची झुंज पाहून कर्मचाऱ्यांच्या जेवणाची एक वेळ व्यवस्था केली होती. चार दिवसांच्या कालावधीत उच्चदाबाचे सर्वच 8 वीजखांब उभारल्यानंतर प्रतापगड, वाडा कुंभरोशी, मेटतळे आदींसह सर्वच 16 गावांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. लघुदाबाचे 26 खांब उभारण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details