सातारा - प्रवाशांना लुबाडणे, मारहाण करणे, जबरी चोरी असे विविध गुन्हे नावावर असणाऱ्या फलटण येथील राजू बोकेसह पाच जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली.
हेही वाचा -धक्कादायक : कोरोना वार्ड परिसरात राबताहेत अल्पवयीन मुले; कालच झाला फडणवीसांचा दौरा
- फलटणच्या बोकेवर १३ गुन्हे
पोलिसांनी सांगितले की, मोक्का कारवाई झालेल्यांमध्ये राजू उर्फ राज राम बोके (वय ३४, रा. मंगळवार पेठ, फलटण), महेश जयराम जगदाळे (वय २७), ऋतिक उर्फ बंटी देवानंद लोंढे (वय १९, दोघेही रा. कांबळेश्वर, ता. बारामती, जि. पुणे), संकेत सुनील जाधव (वय २४, रा. कल्पनानगर, तांदुळवाडी रोड बारामती) आणि दिलीप राजाराम खुडे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, फलटण) अशी संबंधितांची नावे आहेत. महेश जगदाळे हा या टोळीचा म्होरक्या आहे. बोकेवर विविध प्रकारचे १३ गुन्हे नोंद आहेत. तर संकेत जाधव याच्यावर ४, महेश जगदाळेवर ७, दिलीप खुडेवर २ आणि ऋतिक लोंढेवर १ गुन्हा नोंद आहे.
- तीन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र
या टोळीने आर्थिक फायद्यासाठी सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील महामार्ग व इतर जोडरस्त्यांवर प्रवासी दुचाकीस्वार, महिला प्रवासी, दांम्पत्य, व्यापारी यांच्यावर लक्ष ठेवून वाहनांचा पाठलाग करुन हत्याराचा धाक दाखविणे, जबरी चोरी करणे, दुखापत करणे आदी गुन्हे केले होते. त्यामुळे संबंधितांविरोधात फलटण शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण १९९९ अन्वये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे मोक्का प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे हे करीत आहेत.
- 'एसपीं'च्या काळात १० टोळ्यांना मोक्का
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या कार्यकाळात २०२० मध्ये २ आणि या वर्षात आतापर्यंत ८ अशा १० टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ५८ जणांचा समावेश आहे. तसेच ४१ जणांना तडीपार करण्यात आले आहे. यापुढेही गुन्हेगारी टोळ्यांविरोधात मोक्का व तडीपारची कारवाई, करण्यात येईल, असा इशाराही श्री. बन्सल यांनी दिला आहे.
हेही वाचा -ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी सोशल मीडियावर मागितली मदत; तीन तासांत जमा झाले 37 लाख
.....................................................Conclusion: