सातारा : तुर्की आणि सीरियात झालेल्या प्रलयकारी भूकंपाच्या अचूक नोंदी कोयना धरण प्रकल्पाच्या भूकंप मापन केंद्रावर देखील झाल्या आहेत. सोमवारी (दि. 6) 7.8 आणि 6.7 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपांची नोंद भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 6.55 वाजता आणि 2 वाजता भूकंप मापन केंद्रावर झाली आहे. यानिमित्ताने कोयना भूकंप मापन केंद्राची कार्यक्षमता आणि उपयुक्तता देखील अधोरेखित झाली आहे.
तुर्की, सीरियात भूकंप :तुर्की आणि सीरिया ही दोन्ही देश सोमवारी (दि. 6) शक्तीशाली भूकंपाने हादरले. इमारती पत्त्यासारख्या कोसळून मोठ्या प्रमाणात जीवीत हानी झाली. या विध्वंसकारी भूकंपाने संपूर्ण जग हादरले. सुमारे साडे चार हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या तुर्की आणि सीरियातील या भूकंपाच्या अचूक नोंदी सातार्यातील कोयना धरणाच्या भूकंप मापन केंद्रावर झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या कोयना धरणाचा परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र मानला जातो. त्यामुळे धरण पूर्ण झाल्यापासून याठिकाणी भूकंप मापन केंद्र कार्यान्वित आहे.
शेकडो भूकंपाच्या नोंदी :कोयना धरण परिसरात भूकंपाची मालिका सुरू असते. काही भूकंप जाणवतात तर अतिसौम्य भूकंप जाणवतही नाहीत. अशा भूकंपाची संख्या वर्षभरात हजारोंच्या पटीत असते. मागील वर्षाच्या अगदी सुरूवातीलाच दि. 8 जानेवारी 2022 रोजी 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर दि. 1 फेब्रुवारीला 3.2 रिश्टर स्केल तर दि. 22 जुलै रोजी भूकंपाचा तिसरा सौम्य धक्का आणि 22 ऑक्टोबर रोजी 2.8 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता.