सातारा -फलटण बसस्थानकात आश्रयास असलेल्या ५० ते ५५ वयाच्या बेघर महिलेचा खून झाला आहे. या गुन्ह्यातील संशयिताला घटनास्थळावरून पकडण्यात आले आहे. अविनाश रोहिदास जाधव (रा. संतोषीमाता नगर, मलठण) असे संशयिताचे नाव आहे. संशयिताने हे कृत्य दारूच्या नशेत केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण बसस्थानकांतर्गत बारामतीस जाण्यासाठी छोटेखानी बसस्थानक आहे. या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी शेड आहे. कोरोना संसर्गामुळे बसेस व प्रवासी संख्या फारशी नसल्याने या ठिकाणी फारशी वर्दळ नसते. या शेडमध्येच एक महिला गेल्या काही महिन्यांपासून आश्रयास होती. तिला चालता येत नसल्याने प्रवाशांकडून मागून घेऊन ती आपला उदरनिर्वाह करायची.
महिलेच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येत होते
सकाळी सातच्या सुमारास बसस्थानकातील सुरक्षा रक्षक दत्तात्रय सोनवलकर बसस्थानकातील लाइट बंद करीत असताना त्याला शेडमध्ये एका बाकावर २५ ते ३० वयोगटातील तरुण अर्धनग्न अवस्थेत झोपला असल्याचे व बाकाखाली फरशीवर ५० ते ५५ वयोगटातील महिला पालथ्या व अर्धनग्न अवस्थेत पडल्याचे दिसले. महिलेच्या तोंडातून व डोक्यातून रक्त येत होते. सोनवलकर याने या प्रकाराची कल्पना आगार व्यवस्थापक नंदकुमार धुमाळ यांना दिली.