कराड (सातारा) -शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत अर्थिक नुकसान झाल्यामुळे मुलाने स्वत:च्याच घरातील 35 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार खटाव तालुक्यातील कातरखटाव गावातील चोरीच्या घटनेमध्ये समोर आला आहे. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तेजस तानाजी देशमुख यास पोलिसांनी अटक केली आहे. कोणताही पुरावा नसताना स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी कौशल्य पणाला लावून चोरीच्या घटनेचा पर्दाफाश केल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांचे कौतुक केले.
जबरी चोरीमुळे खटाव परिसर हादरला -कातरखटाव गावातील तानाजी देशमुख यांच्या घरातून शुक्रवारी (दि. 15) भरदिवसा 35 तोळ्याचे सोने आणि 30 हजाराची रोकड चोरीस गेल्याचा प्रकार निदर्शनास आला. भरवस्तीतील घरात धाडसी चोरी झाल्यामुळे संपूर्ण कातरखटाव गाव हादरून गेले. सारिका तानाजी देशमुख यांनी मायणी पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोबतच श्वानपथक, ठसे तज्ज्ञांचे पथकही दाखल झाले. मात्र, घटनास्थळी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले. या चोरीचा छडा लावण्याचे आव्हान स्विकारत स्थानिक गुन्हे शाखेसह वडूज पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावून तपासाला सुरूवात केली.