सातारा -ओएलएक्स वेबसाईटवर कार विक्रीची जाहिरात देऊन कार विकत घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्याकडून ७६ हजार रूपयाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एकावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन संजय परसोदकर (रा. विठलेश्वर पेठ, राजगुरूनगर-खेड, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी तोसिफ शब्बीर मुल्ला (रा. म्हासोली, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.
ओएलएक्सवर कार विक्रीची जाहिरात देऊन ७६ हजाराची फसवणूक
ओएलएक्स वेबसाईटवर कार विक्रीची जाहिरात देऊन कार विकत घेण्याासाठी इच्छुक असणाऱ्याकडून ७६ हजार रुपयाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोसिफ मुल्ला यांनी ओएलएक्स वेबसाईटवर मारूती सुझुकीची वेरना कार विक्रीची जाहिरात पाहिली. जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, संबंधिताने तो कॉल घेतला नाही. म्हणून फिर्यादी मुल्ला यांनी मेसेज पाठवला. मेसेज पाहिल्यानंतर सचिन परसोदकर यांनी मुल्ला यांना फोन करून मोबाईलवर गाडीचे फोटो पाठवले. आपण आर्मीत असून जम्मू-काश्मिरला बदली झाल्यामुळे कार विकत असल्याचे सांगितले. त्यांने अकाऊंटवर वेळोवेळी पैसे पाठवायला सांगितले. 76 हजार 940 रूपये पाठवूनसुध्दा गाडी पाठवून दिली नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे पाठवण्यास सांगण्यात येऊ लागल्याने मुल्ला यांना संशय आला. त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात सचिन संजय परसोदकर याच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली. त्यावरून परसोदकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.