सांगली-मामाच्या मुलीशी असणारे संबंध तोडले नाहीत, म्हणून जत तालुक्यातील दरीबडची येथील 19 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घडली. धनाजी टेंगले असे मृत तरुणाचे नाव आहे. या खुनाने जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जत पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी खूनाची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मामाच्या मुलीचा नाद सोड म्हणून तगादाअधिक माहिती अशी, की मृत धनाची टेंगले याचे आरोपी राजू लेंगरे यांच्या मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. ही बाब आरोपी राजूला माहीत होती. मात्र, राजू याची त्या मुलीसोबत लग्न करण्याची चर्चा त्यांच्या घरातील नातेवाईक यांच्यात सुरू होती. यातूनच राजू व धनाजी यांच्यात धुसफूस सुरू होती. राजू लेंगरे याने धनाजीस मामाच्या मुलीचा नाद सोड म्हणून तगादा लावला होता. तरीही संबंध सुरू असल्याचा संशय आरोपी राजूला होता.
रात्री दूध घालून शेताकडे जाताना पाळत ठेवून खूनगुरुवारी सायंकाळी धनाजी टेंगळे हा नेहमीप्रमाणे दूध घालण्यासाठी दरीबडची गावात आला होता. दूध घालून तो दररोज आठपर्यंत घरी जात होता. मात्र गुरुवारी रात्री दहा-साडेदहा वाजले तरी घरी परतला नाही म्हणून घरातील वडील व नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना दरीबडची कुलाळवाडी रस्त्यावर टेंगले यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर रस्त्यावर धनाजी यांचा मृतदेह दिसून आला. धनाजी यांच्या डोक्यात आणि तोंडावर दगडाने गंभीर वार करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी दुधाची किटली, चप्पल तिथेच पडलेली होती. पाळत ठेवून पद्धतशीरपणे त्यांचा खून करण्यात आला.घरातील लोकांनी या घटनेची माहिती जत पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सहायक निरीक्षक महेश मोहिते, अमर भाई फकीर यांनी तातडीने दरीबडची येथील घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने या प्रकरणी संबंधित दहा ते बारा जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच यातील संशयित आरोपी राजू लेंगरे हा दरीबडची व आदिनाथ हक्के राहणार पांढरेवाडी या दोघांनी हा खून आपणच केल्याचे पोलिसांना कबुली दिली. पोलिसांनी उर्वरित आरोपींना सोडून या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक निरीक्षक महेश मोहिते घटनेचा तपास करीत आहेत.