सांगली -शहरातील एका चष्मा दुकानावर कारवाईसाठी गेल्यानंतर पोलीस पथक व चष्मा दुकानदारांमध्ये वादाचा प्रकार घडला आहे. यावेळी संतप्त झालेल्या दुकानदाराने पोलीस पथकाला थेट भर रस्त्यावर लाच पाहिजे का? अशा शब्दात विचारणा केली. यानंतर पोलीस पथकाने काढता पाय घेतला. विश्रामबाग चौक याठिकाणी हा प्रकार घडला असून, व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस पथकाच्या कारवाईवर प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस आणि दुकानदारामधील संभाषण हेही वाचा -विधानसभा अध्यक्ष येत्या अधिवेशनात निवडला जाणार, तर अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार - बाळासाहेब थोरात
- कारवाईविरोधात दुकानदाराचा सवाल -
सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या चौथ्या स्तरातील निर्बंध सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यातून शहरातल्या विश्रामबाग चौक या ठिकाणी एका चष्मा दुकानावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथक आणि दुकानदारामध्ये वादावादीचा प्रकार घडला आहे. पोलिसांकडून चष्म्याचे दुकान बंद करण्यासाठी सांगण्यात आले. मात्र, चष्म्याच्या दुकानाला परवानगी असल्याने दुकानदाराने विरोध केला. यातून दुकानदार आणि पोलीस यांच्यात वाद झाला. या दरम्यान दुकानदाराने पोलिसांना चांगलेच खडसावत 'तुम्हाला पैसे पाहिजेत का? लाच पाहिजे का? सांगा देतो...' असे विचारत संताप व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी दुकानासमोरून काढता पाय घेत निघून जाणे पसंत केलं.
दरम्यान, दुकानदार आणि पोलिसांमधील या शाब्दिक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पथकाकडून होणाऱ्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा -#Cylinder man : गॅसवाला कसा बनला "सिलिंडर मॅन"? जाणून घ्या...