सांगली- भारतात नवनवीन संशोधन सुरू आहेत. पण अजूनही ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धेचा पगडा कमी झालेला नाही. याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली. चुलत काकाने आपल्या घराच्या नावाने देव उठवलाय आणि त्यामुळेच आपल्या घरात भांडणे होत आहेत, अशा अंधश्रद्धेतून पुतण्याने काकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार शिराळा तालुक्यातील कांदे गावात घडला आहे.
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कांदे येथे मंगळवारी दुपारी अपहरण करून हा खून करण्यात आला. तुकाराम मारुती कुंभार (वय ६०) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी राहूल बाळासाहेब कुंभार (वय २५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, तुकाराम कुंभार हे चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास सहकारी साखर कारखान्याच्या नर्सरीत कामाला आहेत. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले. सायंकाळी सहाला ते घरी परत यायचे. काल ते परतले नाहीत म्हणून साऱ्यांना शंका आली. सर्वत्र शोधाशोध केली. त्यातून एकाने राहूल कुंभार यानेच तुकाराम यांचे काहीतरी बरेवाईट केले आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.