सांगली- दरवर्षी पुरुषांना काठीने बेदम बदडून काढत अनोखी होळी सांगलीच्या मिरजेत गोसावी समाजाच्या महिला साजरी करत असतात. ही परंपरा शेकडो वर्षांपासून गोसावी समाज जोपासत आहे. लाठीचा खेळ या माध्यमातून ही आगळी-वेगळी होळी महिला आणि पुरुष खेळतात.
झेंडा पळवण्यासाठी आलेल्या पुरुषांना महिला काठीने मारतात देशभरात होळीचा सण वेगवेगळ्या परंपरेच्या माध्यमातून ठिकठिकाणी साजरा केला जातो. अशीच एक वेगळी परंपरा सांगलीच्या मिरजेत होळीच्या निमित्ताने पाहायला मिळते. गोसावी समाजाकडून शेकडो वर्षांपासून या ठिकाणी होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. यामध्ये महिला पुरुषांची धुलाई करत होळी साजरी करत असतात.
काय आहे खेळ -
शेकडो वर्षांपासून गोसावी समाजात होळीच्या निमित्ताने तिसऱ्या दिवशी "झेंड्याचा खेळ" खेळला जातो. गल्लीच्या मध्यभागी महिलांच्या गराड्यात झेंडा रोवला जातो. ज्यामध्ये पैसे बांधून ठेवले जातात. त्याची कमान महिलांच्या हातात असते. हा झेंडा पळवण्याचे आव्हान पुरुषांसमोर असते. तर या झेंड्याच्या संरक्षणाची जबाबदारी महिलांची असते. हातात काठी घेऊन महिला या झेंड्याचे संरक्षण करतात.
रंगाची उधळण करत झेंडा पळवण्याचा खेळ खेळला जातो. यामध्ये झेंडा पळवण्यासाठी येणाऱ्या पुरुषांना महिला हातातील लाठ्या-काठ्यांनी बदडून काढत पिटाळून लावतात. या खेळाच्या निमित्ताने महिलाकडून पुरुषांची यथेच्छ धुलाई होते. मात्र, एरवी पत्नीस मारहाण करणारे पती यानिमित्ताने महिलांकडून आनंदाने मार खात असतात.