सांगली - दुचाकी आडवी मारल्याच्या रागातून गेल्या आठवड्यात साळशिंगे (ता.खानापूर) येथील मोबाईल शॉपी मालकाची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी तपास करून तीन संशयितांना अटक केली आहे. ओंकार उर्फ मुरली दशरथ गेजगे (21, रा. साईनगर, शहापूर, इचलकरंजी) याच्यासह सागर रामचंद्र ऐवळे (19), रोहन उर्फ चिक्या बापूराव रावताळे (21, दोघे रा. घानवड, ता.खानापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सागर भेंडवडे येथील बालाजी करांडे यांची विटा येथील खानापूर रोडला साई मोबाईल शॉपी आहे. ६ नोव्हेंबरला त्यांचा साळशिंगे येथे धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या अपघात दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांपुढे तपास करण्याचे मोठे आव्हान होते. विटा पोलिसांना या हत्येचे धागेदोरे मिळत नव्हते. अतिरिक्त पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच पोलिसांना तपासाबाबत सुचना दिल्या होत्या. तपासात खूनाचे इचलकरंजी कनेक्शन असल्याची माहिती इचलकरंजी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एन. एच. फरास यांना मिळाली होती.
हेही वाचा - उस्मानाबादमध्ये डोळ्यात मिरची पूड टाकून दोन लाख लुटणाऱ्या 6 आरोपींना अटक
त्यानुसार मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयित आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. विटा आणि घानवड परिसरातून ओंकार गेजगे, सागर ऐवळे आणि रोहन रावताळे या तीनही संशयितांना मंगळवारी रात्री इचलकरंजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. इचलकरंजीतील शहापूर परिसरात राहणारा ओंकार गेजगे याची आत्या लक्ष्मी शंकर जावीर ही घानवड येथे राहण्यास आहे. त्यातूनच त्याची सागर ऐवळे आणि रोहन रावताळे याच्याशी ओळख झाली.