सांगली - जत शहरात भर दिवसा चोरीची घटना घडली आहे. शहरातील महाराष्ट्र बँके समोरून एका चारचाकी गाडीत ठेवलेले 3 लाख 70 हजारांची रोकड लंपास करण्यात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ही चोरी केली आहे.
भर दिवसा,भर बाजारात जबरी चोरी
जत शहरात असणाऱ्या महाराष्ट्र बँकेसमोर मंगळवारी (दि. 21 सप्टेंबर) धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. बँकेसमोर थांबलेल्या एका चारचाकी गाडीतून तीन लाख 70 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हातोहात लंपास केली आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि बँकेच्या समोरच हा धाडसी चोरीचा प्रकार घडल्याने नागरिक, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
सिने स्टाईल केली चोरी
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, जतमधील संभाजी चौगुले हे महाराष्ट्र बँकेत पैसे काढण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीतून आले होते. बँके समोर त्यांनी आपली गाडी उभी करत बँकेतून पैसे काढण्यासाठी गेले. त्यानंतर चौगुले हे पैशाने भरलेली बॅग घेऊन बँकेतून बाहेर पडत आपल्या गाडीकडे गेले. त्यांनी गाडीच्या मागील बाजूस असणाऱ्या आसनावर पैशाने भरलेली बॅग ठेवत गाडी चालवण्यासाठी बसले. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या पुढील चाकाची हवा गेल्याची जाणीव झाली. त्यांनी गाडीतून बाहेर डोकावून चाकातील हवा पाहण्याचा प्रयत्न करताच त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्याने क्षणात गाडीचा दरवाजा उघडून गाडीतील 3 लाख 70 हजारांची रोकड असलेली बॅग घेत पलायन केले.
हेही वाचा -एसटीचे विलीनीकरण करा, अन्यथा संघर्ष अटळ - गोपीचंद पडळकर