सांगली - मटणाच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर शेळ्या चोरीचा घटना आता वाढू लागल्या आहेत. मिरज तालुक्यातील एरंडोली येथील एका शेतकऱ्याच्या सगळ्याच्या सगळ्या शेळ्या चोरट्यांनी पळवल्या आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मटणाच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा शेळ्यांवर डल्ला मटणाच्या वाढलेल्या दरामुळे नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रात मोठा आक्रोश निर्माण झाला होता. वाढलेल्या दराविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनही झाले होते. मात्र, मटणाच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर शेळ्या चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रकार घडत होते. मात्र, मिरज तालुक्यातील एरंडोली येथील रघुनाथ पाटील दाम्पत्याच्या शेळीच्या कळपावरच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
हेही वाचा -मद्यधुंद चालकामुळे उत्तर प्रदेशात डबल डेकर बस पलटली, १५ जखमी
पाटील या वृद्ध दाम्पत्याच्या घराशेजारीच असणाऱ्या शेडमध्ये पाच ते सात शेळ्या कोकरांसह चोरट्यांनी पळवल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी येथील शेडमध्ये असलेला अख्खा शेळ्यांचा कळपच चोरून नेला. यावेळी घरात राहणाऱ्या पाटील दाम्पत्याला कडी लावून कोंडून घालण्यात आले होते. पाटील दाम्पत्यांचा उदरनिर्वाह थोड्याफार प्रमाणात या शेळी पालनावर सुरू होता. मात्र, सगळ्या शेळ्या चोरीला गेल्याने पाटील कुटुंब हवालदिल झाले आहे.
हेही वाचा -राजर्षी शाहूंच्या समाधी स्मारक लोकार्पण सोहळ्याला जनक घराण्यालाच निमंत्रण नाही ! पाहा काय म्हणाले समरजितराजे
शेळ्यांच्या चोरीच्या घटनेची गावात आणि पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे. तर शेळी पालन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मटणाच्या वाढलेल्या दराचे परिणाम म्हणून शेळ्यांची चोरी होत असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी याबाबत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.