सांगली- महापूर आता ओसरला आहे. पण, महापुराच्या तडाख्याने अनेकांचे संसार उधवस्त झाले आहेत. होत्याचे नव्हते झाले, घर वाहून गेले, संसार उघड्यावर पडला आहे. काय करायचे हा प्रश्न अनेकांच्या समोर उभा ठाकला आहे. यापैकी वाळवा गावातील एक कुटुंब. दोन वेळा पुराशी सामना करणारे वडर कुटुंबीयांचे घर यंदा मात्र कोसळून गेले आहे,त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या या कुटुंबांना आता पुन्हा जगण्याची लढाई करावी लागणार आहे. पाहूया महापुरा नंतरची जगण्याची लढाई..
कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. या महापुरात गावंच्या-गावं बुडाली. शहर महापुराच्या विळख्यात सापडले. महापुराने सर्व पातळ्यांवर अतोनात नुकसान केले. मग तो सर्वसामान्य माणूस असो की गर्भश्रीमंत, सर्वांनाच महापुराचा यंदा जबर तडाखा बसला आहे. 2019 मधील महापूर त्यानंतरची कोरोनाची महामारी आणि पुन्हा महापुराचे संकट,अशा चक्रात कृष्णा आणि वारणाकाठ अडकला आहे. खरेतर सांगलीचा कृष्णाकाठाला आता महापूर नवा नाही. मात्र, महापुराचे दरवर्षी वेगवेगळे परिणाम पहायला मिळत आहेत. नुकसानाचे पातळी दर वेळी वाढत चालली आहे. यंदाच्या महापुराने 2019 च्या तुलनेत सर्वाधिक नुकसान केल्याचे प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे.
घराची नव्हे संसाराचीही वाताहत
महापुराचा सर्वाधिक तडाखा हा हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना अधिक बसतो. मग तो शहरातील पूर पट्ट्यातील असो की गावगाड्यातील वाडी वस्तीवरील असो, या सर्वांचे संसार उध्वस्त होतात. 2005, 2019 आणि यंदाच्या महापुरातही प्रचंड नुकसान झाले आहे. अशाच एक कुटुंबांपैकी वाळवा येथील वडर कुटुंब, कैकाडी वस्तीत राहणाऱ्या कुटुंबात पाच व्यक्ती आणि पाच लहान मुले आहेत. तसे त्यांचे घर हे नदीकडेला नसले तरी नदीचे पाणी जेथून आत शिरते त्या ओढ्याच्या काठावर आहे.
परशुराम वडर घराचे कुटुंबप्रमुख त्याची आई, भाऊ, पत्नी, वहिनी, मुले, असा त्यांचा परिवार आहे. अनेक वर्षांपासून वडर गल्लीतील कैकाडी वस्तीवर ते राहतात. 2005 मध्ये आलेला महापूर त्यानंतर 2019 मध्ये आलेला महापूर त्यांनी पाहिला आहे. 2019 मधील महापुरातही त्यांचे घरा बुडाले होते. त्यामुळे थोडे फार नुकसान झाले होते. त्यानंतर कसबसे त्यांनी आपले घर-कुटुंब पुन्हा सावरले. मात्र, यंदाच्या महापुरात त्यांचे घर उध्वस्त झाला आहे. मातीचे असणारे घर जमीनदोस्त झाले आहे. घराच्या केवळ तीनच भिंती उरले आहेत. छताची कौलही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यामुळे वडर कुटुंबांचा संसार हा उघड्यावर आला आहे.
उरल्या फक्त पडक्या भिंती आणि फाटके छत
महापूर आल्यानंतर त्यांची सोय गावातल्या वाळवा ग्रामपंचायतीच्या वतीने हुतात्मा संकुलात करण्यात आली. काही दिवस त्याठिकाणी त्यांनी महापुराच्या परिस्थितीमध्ये काढले. पूर ओसरल्यावर वडर कुटुंब, ज्यावेळी घरी परतले. त्यावेळी घराची भग्नावस्थ पाहून जणू त्यांच्यावर डोंगर कोसळले. रहायला घर नाही, आता जायचे कुठे? हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी घराच्या शेजारी असणारा शेळ्यांच्या गोठ्याला प्लॅस्टिक कागदचा आडोसा करत शेळ्यांच्या सोबत आपला संसार थाटला आहे.