सांगली - शाळेमध्ये तपासणी न करताच हजर झालेल्या एका शिक्षकाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे ऑक्सिजन तपासणी या शिक्षकाने केल्याची बाबही समोर आली आहे. मिरज तालुक्यातील बेडग येथे हा प्रकार घडला आहे.
72 विद्यार्थ्यांची तपासली ऑक्सिजन पातळी -
राज्य शासनेच्या सूचनेनुसार नववी ते बारावी या वर्गाच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करून शिक्षकांना शाळेत हजर राहण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथे एक खासगी शाळा सुरू झाल्यानंतर एका शिक्षकाने कोरोनाची टेस्ट न करता शाळेमध्ये उपस्थिती लावली होती. इतकेच नव्हे तर या शिक्षकाकडून शाळेत हजर राहणाऱ्या 72 विद्यार्थ्यांची ऑक्सीमिटरने ऑक्सिजन तपासणी करण्यात आल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
हेही वाचा -वीज बिले भरणार नाही; हिंमत असेल तर कनेक्शन तोडून दाखवा, राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा
14 दिवसांसाठी शाळा बंद..
दुपारनंतर या शिक्षकाची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्या शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने शाळेत उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना कल्पना देऊन खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय पुढील 14 दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मिरज तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.