सांगली -कृष्णेच्या महापुरात थेट आयर्विन पुलाच्या खाली उतरून धोकादायक सेल्फी काढण्याच्या मोहामुळे एका तरुणाची चांगलीच फजिती झाली. पाण्याचा प्रचंड प्रवाह असताना बोटीतून पुलाच्या खांबावर चढून तरूणाने सेल्फी काढला. मात्र, पुन्हा बोटीत उतरणे मुश्कील झाले. त्यामुळे तरुणाला पुन्हा बोटीत घेण्यासाठी इतर सहकाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उढाली.
थेट नदी पात्रात जीवघेणा सेल्फी
सांगलीच्या कृष्णा नदीला महापूर आलेला आहे. आयर्विन पुलाच्या खालून पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये काही हौशी-गौशी बोटी घेऊन नदीच्या पात्रात उतरत आहेत. अशात एक तरुण बोटीतून थेट आयर्विन पुलाच्या खाली पोहोचला. पुलाच्या खांबावर चढून सेल्फी काढण्याचा पराक्रम केला. अगदी सहज पद्धतीने बोटीतून पाण्याचा प्रचंड प्रवाह असताना पुलाच्या खांबावर चढला. त्यानंतर जीव धोक्यात घालत सेल्फीही काढला.
सेल्फीनंतर झाली फजिती
मात्र, सेल्फी घेतल्यानंतर प्रचंढ वेग असणाऱ्या पाण्यातून पुन्हा बोटीत बसणे मुश्कील झाले. बोट चालवणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनाही पुलाच्या खांबाशेजारी बोट लावणे अवघड बनले. त्यामुळे काही वेळ तरुण खांबावर अडकून पडला. अथक प्रयत्नानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी पाण्याचा प्रचंढ वेग असताना कशीबशी बोट पुन्हा खांबाजवळ नेली आणि अडकलेल्या आपल्या सहकाऱ्याला पुन्हा बोटीत उतरवून घतले. यानंतर त्याची सुखरूप सुटका झाली. दरम्यान, पंधरा ते वीस मिनिटे हा सर्व थरार सुरू होता. त्यामुळे सेल्फी पराक्रमामुळे तरुणाची आणि त्याच्या सहकाऱ्यांची चांगलीच फजिती झाली.
सांगलीत महापुराच्या पाण्यात स्टंटबाजी आयर्विन पुलावरून नदीत थेट उड्या
यापूर्वी शहरातल्या आयर्विन पुलावरून नदीच्या पात्रामध्ये थेट उड्या मारल्याचा प्रकार समोर आला होता. पुलाच्या संरक्षक लोखंडी ग्रीलवरून नदीच्या पात्रात उंच उडी मारल्याचा एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
कोल्हापुरातही नदीत स्टंटबाजी पुलावरून उड्या मारल्यास दाखल होणार गुन्हा
कृष्णा नदीला पूर आला आहे. त्यातच काही हौशी जलतरणपटू शहरातल्या आयर्विन पुलावरून थेट कृष्णा नदीच्या पात्रात उड्या मारत असल्याचा प्रकार समोर आला. सोशल मीडियावर एका तरुणाकडून आयर्विन पुलावरून नदीपात्रात उडी मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकाराची सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी गंभीर दखल घेतली होती. थेट कृष्णा नदीच्या काठी जाऊन नितीन कापडणीस यांनी पाहणी केली. तसेच 'आयर्विन पुलावरून जर कोणी नदीपात्रात उड्या मारत असतील तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील', असा इशाराही नितीन कापडणीस यांनी दिला होता.
'पात्रात बोटी आढळल्यास जप्त करू'
त्याचबरोबर पाण्याची पातळी वाढल्यानंतर काही खासगी बोटधारक नदीपात्रात फेर फटका मारत असल्याची बाबही समोर आली. याचीही दखल नितीन कापडणीस यांनी घेतली. 'कोणतीही परवानगी न घेता खासगी बोटधारक नदीपात्रात फेरफटका मारताना आढळल्यास त्याची बोट जप्त करण्यात येईल. तसेच महापालिका प्रशासनाकडून पूर परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना आपत्ती मित्र ओळखपत्र देण्यात आले. त्यांच्याकडूनही दुरुपयोग होत असल्याची बाब समोर आल्यास त्याचेही ओळखपत्र आणि नोंदणी रद्द केली जाईल', असा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला होता.
आता पोलीस कारवाई करणार का?
आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह पोलीस प्रशासनाकडून आयर्विन पुलाजवळ सध्या नागरिकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. पुलावरून नदीपात्रात उड्या मारण्यासाठी मनाई आहे. अशा परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून तरूणाने सेल्फी काढण्याचा जो पराक्रम केला आहे, त्याबाबत पोलीस प्रशासन संबंधित तरुणावर कारवाई करणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोल्हापुरातही नदीत स्टंटबाजी
गुरूवारी (22 जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली. दरम्यान, राजाराम बंधारा परिसरात जवळपास पाच ते सहा तरुणांनी पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या. तर एकाने पुराच्या पाण्यात बुडालेल्या विद्युत खांबावर चढत थेट खांबावरून पुराच्या पाण्यात उडी घेतली. या तरुणांच्या स्टंटबाजीमुळे उपस्थित नागरिकांचा थरकाप उडाला. वाचासांगलीला पुन्हा महापूराचा धोका..! कृष्णेची पातळी 52 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज
हेही वाचा -मुख्यमंत्री ठाकरे महाड दौऱ्यावर रवाना, तळई गावाला देणार भेट