जत (सांगली)- उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांचे घर्षण झाल्याने तब्बल दोन एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि. 16 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. जत तालुक्यातील भिवर्गी येथील महादेव मल्लाप्पा कुंभार यांचे 5 एकरातील दोन एकर ऊस वीजवितरण शॉर्टसर्किटमुळे आगीत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे जवळपास तीन एकरातील ऊस आगीपासून वाचवण्यात आले आहे.
वीजवितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे तोडणीस आलेला ऊस जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी महादेव कुंभार यांच्या शेतातून विद्युत तारा गेल्या आहेत. विद्युत तारा जुन्या असल्याने अनेकदा शॉर्टसर्किट होत असते. त्यामुळे अनेकदा येथील शेतकऱ्यांनी वीजवितरण तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र, वीजवितरण कंपनीने याकडे लक्ष दिलेले नाही.सोमवारी सायंकाळी चारच्या दरम्यान महादेव कुंभार यांच्या शेतात विद्युत तारांच्या घर्षणामुळे उसाच्या शेताला आग लागली.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.यामुळे वीजवितरण कंपनीचा हलगर्जीपणा समोर आला आहे.आधीच कोरोना आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. त्यात वीजवितरण कंपनीच्या गोंधळलेल्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.
'शॉर्टसर्किट'मुळे दोन एकरावरील ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान
जत तालुक्यातील भिवर्गी येथे महादेव मल्लाप्पा कुंभार यांचे दोन एकर ऊस वीजवितरण कंपनीच्या शॉर्टसर्किटमुळे आगीत जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. आधीच कोरोना आणि अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी संकटात आहे. त्यात वीजवितरण कंपनीच्या गोधळलेल्या कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेले ऊस
दुसरीकडे पंचनाम्यासाठी तलाठी गावात हजर नसल्याने गावाच्या कोतवालाकडूनच जळीताच्या शेताची पंचनाम्याची कारवाई आटोपल्याची दिसून आले आहे. आपतकालीन परिस्थितीत प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी हजर राहून कामकाज करणे अपेक्षित असताना कर्मचारी संवेदनशील परिस्थितीतही कामात कुचराई करताना पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.