महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्तव्यावर असताना अल्पशा आजाराने जवानाचा मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - विकास चौगुले

जम्मू येथे कार्यरत असलेले सांगलीचे जवान विकास चौगुले यांचा अल्पशा आजाराने उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला होता. आज त्यांच्या पार्थिवावर मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जवान विकास चौगुले

By

Published : Feb 17, 2019, 6:40 PM IST

सांगली - जम्मू येथे कार्यरत असलेले सांगलीचे जवान विकास चौगुले यांचा अल्पशा आजाराने उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला होता. आज त्यांच्या पार्थिवावर मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान विकास चौगुले हे काही दिवसापासून दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात उपचार घेत होते.

जवान विकास चौगुले

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक येथील जवान विकास गुंगा चौगुले (वय ३८) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने दिल्ली येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांना जम्मू येथे कर्तव्य बजावत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ उपचारासाठी दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते १६ वर्षापासून लष्करात होते. त्यांना मागील महिन्यातही छातीमधील वेदनेमुळे अस्वस्थ वाटत होते. उपचार घेऊन ते पुन्हा कर्तव्यावर रुजु झाले होते. मात्र, पुन्हा अस्वस्थ वाटु लागल्याने त्यांच्यावर दिल्ली येथे उपचार सुरू होते.


शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव दिल्लीहुन शिराळा येथे रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास लष्करी अधिकाऱ्यासमवेत पोहोचले. तेथून जवान विकास यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी अंत्री बुद्रुक येथे सकाळी ७ वाजता आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सैन्यदलाने फैरी झाडत सलामी दिली. विकास यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आमदार शिवाजीराव नाईक, तहसिलदार शितलकुमार यादव, तसेच लष्करी अधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details