सांगली- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद मिरजमध्ये उमटले आहेत. शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकार आणि कन्नड यांच्या विरोधात मिरजेत आंदोलन करण्यात आले आहे. मिरजेच्या एसटी येथे रस्ता रोको करत कर्नाटक राज्यातल्या गाड्यावर भगवे आणि काळे ध्वज लावून शिवसेना जिल्हाध्यक्षांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा जोरदार निषेध नोंदवण्यात आला आहे.
कर्नाटक सरकार विरोधात शिवसेनेचा रस्ता रोको कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन..कर्नाटकच्या बेळगाव या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्याचे संतप्त पडसाद महाराष्ट्र आणि विशेष करून सीमावर्ती महाराष्ट्र भागात उमटत आहेत. शनिवारी मिरजेत शिवसेनेकडून कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी मिरज एसटी स्टँड समोरील कर्नाटककडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी कर्नाटक राज्यातल्या वाहनांना अडवून त्या गाड्यांवर काळे आणि भगवे ध्वज लावून कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि शिवसेना नेते महेश कांबळे,शंभूराजे काटकर यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
अन्यथा यापुढे कर्नाटक मध्ये घुसू..तसेच कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील कन्नड व्यवसायिकांनी बंद पाळावा, असे आवाहन ही शिवसेनेकडून करण्यात आला होते. त्याला कन्नड व्यवसायिकांनी पाठिंबा देत मराठी भाषकांच्या आंदोलनामध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कर्नाटक सरकारने सीमावादाचा प्रश्न न्यायालयात असल्याने तो निकाल लागेपर्यंत मराठी भाषिकांवर अत्याचार करू नये, अन्यथा शिवसैनिक कर्नाटकमध्ये घुसून कर्नाटक सरकारला धडा शिकवेल, असा इशारा यावेळी संजय विभूते यांनी दिला आहे.