सांगली - पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ सांगलीमध्ये सायकल मोर्चा काढण्यात आला. यावेळी सायकल रीक्षावर दुचाकी ठेवून इंधन दरवाढीचा निषेध नोंदवत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा सायकल मोर्चा काढण्यात आला.
इंधन दरवाढी विरोधात सायकल मोर्चा-केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टीने ही दरवाढ अन्यायकारक असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने आज सांगलीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने सायकल मोर्चा काढण्यात आला. सांगली शहरातल्या स्टेशन चौक येथून विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा सायकल मोर्चा निघाला, यावेळी अनेक शिवसैनिकांनी सायकल घेऊन या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला होता. तर केंद्राच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना पेट्रोल घेणे आर्थिक दृष्ट्या त्रासदायक होत आहे. हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी एका सायकल गाडीवर दुचाकी ठेवून त्याला पेट्रोलचे सलाईन लावण्यात आले होते.
मोर्चा सायकलचा पण दुचाकी संख्या अधिक-शिवसेनेकडून या इंधन दरवाढीच्या विरोधात सायकल मोर्चाची हाक देण्यात आली होती. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सायकल घेऊन सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी केले होते. मात्र या सायकल मोर्चामध्ये मोजक्याच शिवसैनिकांनी सायकल घेऊन सहभाग नोंदवला होता. त्यापेक्षा अधिक संख्या ही दुचाकीवरून सहभागी झालेल्या कार्यकर्ते आणि नेत्यांची पाहायला मिळाली. त्यामुळे हा मोर्चा सायकलचा होता की दुचाकींचा होता ? हा प्रश्न यावेळी निर्माण झाला होता.