महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 24, 2021, 12:30 PM IST

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंबद्दल बेताल वक्तव्य, नारायण राणेंच्या फोटोवर शिवसैनिकांनी फेकली शाई

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल खालच्या थराचे वक्तव्य केले. यावरून राणेंना टीकाचा सामना करावा लागत आहे. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सांगलीत राणेंच्या फोटोवर शाई फेकण्यात आली आहे.

sangli
sangli

सांगली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचे सांगलीत संतप्त पडसाद उमटले आहेत. संतप्त शिवसैनिकांनी डिजिटल फलकावरील मंत्री नारायण राणे यांच्या फोटोला काळे फासले आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या पोस्टवर शिवसैनिकांनी काळी शाई फेकून निषेध नोंदवला आहे.

नारायण राणेंच्या फोटोवर शिवसैनिकांनी फेकली शाई

राणेंच्या फोटोवर फेकली शाई...

भाजपच्या केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काना खाली लावण्याबाबतचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत. सांगलीमध्येही नारायण राणे यांच्या वक्तव्याचा जोरदार पडसाद उमटले आहेत. संतप्त शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोला काळे फसले आहे. सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयासमोर राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दलचा डिजिटल फलक लावण्यात आला होता. या फलकावर नारायण राणे यांचा फोटो होता. सकाळच्या सुमारास शिवसैनिकांनी याठिकाणी पोहचून मंत्री नारायण राणे यांच्या फोटोवर काळी शाई फेकली आहे.

सांगलीत राणेंच्या फोटोवर फेकली शाई

"त्या" शिवसैनिकाला अटक

घटनेची माहिती मिळताच याठिकाणी विश्रामबाग पोलिसांनी धाव घेत गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शाई फेकलेले पोस्टर उतरवले. तर पोलिसांनी मंत्री नारायण राणे यांच्या फोटोवर शाई फेकणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. अमोल कांबळे असे या शिवसैनिकाचं नाव आहे.

राणेंना इशारा

तर शहर उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी नारायण राणे यांना इशारा दिला आहे. 'राणेंचे वक्तव्य असेच सुरू राहिले तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ. जिल्हाभर राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे', असे शंभूराज काटकर यांनी म्हटले आहे.

नक्की काय म्हणाले राणे?

'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा काल (23 ऑगस्ट) रायगड जिल्ह्यात आली होती. त्या दरम्यान महाड येथील पत्रकार परिषदेत राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पाहा व्हिडिओ

राणेंविरोधात गुन्हा दाखल

भाजपची जनआशीर्वाद यात्रा काल (23 ऑगस्ट) दक्षिण रायगडमध्ये दाखल झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा पाली येथून निघाली. महाड शहरात आल्यानंतर पीजी रेसिडन्सी रिसॉर्टमध्ये नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या थराची टीका करून नारायण राणेंनी गदारोळ माजवला आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात आज (24 ऑगस्ट) पहाटे नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड शहरचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. तर, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथेही राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -'नारायण राणे "कोंबडी चोर"', मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर शिवसैनिक संतप्त

ABOUT THE AUTHOR

...view details