सांगली - शिवप्रतिष्ठानमधील फूट अटळ दिसत आहे. शिवप्रतिष्ठानमधून निलंबित केलेले नितीन चौगुले आणि त्यांच्या समर्थक धारकाऱ्यांचा मेळावा आज सांगलीमध्ये पार पडत आहे. या मेळाव्यात चौगुले काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवप्रतिष्ठानमध्ये फूट अटळ?
संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेते गेल्या 20 वर्षांपासून हिंदुत्ववादी व भिडे गुरुजींचे कट्टर समर्थक म्हणून नितीन चौगुले यांना ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून नितीन चौगुले हे शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक म्हणून काम करत होते. शिवप्रतिष्ठानमध्ये संभाजी भिडे गुरुजी यांच्या शब्दाबरोबर नितीन चौगुले यांच्या शब्दालाही तितकाचा मान होता. मात्र, 5 फेब्रुवारीला शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत नितीन चौगुले यांना पक्षातून काढून टाकल्याचे स्पष्ट केले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे शिवप्रतिष्ठानसह राज्यात खळबळ उडाली होती. निलंबनाचे कारण जाणून घेण्यासाठ नितीन चौगुले आणि समर्थकांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या मारला होता.
नितीन चौगुले करणार भूमिका स्पष्ट -
नितीन चौगुले यांना अद्याप निलंबनाचे कारण दिलेले नाही. स्वत:वर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नितीन चौगुले आणि समर्थक धारकऱ्यांनी राज्यातील धारकाऱ्यांना चलो सांगलीची हाक दिली होती. आज(रविवार) सांगलीच्या डेक्कन हॉल याठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नितीन चौगुले झालेल्या कारवाईबाबत चर्चा करणार आहेत. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत खुलासा करत आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे नितीन चौगुले समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चार वाजता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.