कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आणि मतदानाला अवघे ४ दिवस शिल्लक असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी भाजप-शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट; राजू शेट्टींना एकटं पाडण्याचा डाव?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
देशमुख हे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील कोकरूड गावचे रहिवासी असून २००९ पासून ते स्वाभिमानीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. प्रत्येक आंदोलनात राजू शेट्टींसोबत देशमुखांनी काम केले आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राजू शेट्टी जाऊन बसले आणि त्यांच्यासोबत महाघाडीत सामील झाले. म्हणून भाजप-शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हेही उपस्थित होते.
यावेळी सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली तर पाशा पटेल यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता डोळे असून पण आंधळेपणाचे नाटक करणाऱ्या नेत्यांना मी पाहिले असल्याचे म्हटले.