सांगली- कोरोनाचा मोठा फटका पोल्ट्री व्यवसाय आणि शेतीला बसला असून याची नुकसानभरपाई म्हणून सरकारने पोल्ट्रीधारक आणि शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. तर प्रत्येक कोंबडीमागे 200 रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील हे बोलत होते.
चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशी अफवा पसरल्याने राज्यातील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे चिकनकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने कोंबड्यांचा उठाव बंद झाला. परिणामी दरही घसरले, त्यामुळे अनेक पोल्ट्री व्यवसायिकांनी कोंबड्यांना ठार मारले. तर कोणी कोंबड्या फुकट वाटल्या, यामुळे पोल्ट्री व्यवसायाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. शेती पूरक असणारा हा व्यवसाय हा केवळ कोरोनाच्या अफवेने आज अडचणीत सापडला असल्याने सरकारने याबाबतीत लक्ष घालून पोल्ट्री व्यवसायाला अनुदान दिले पाहीजे. तसेच प्रत्येक कोंबडीमागे नुकसानग्रस्त पोल्ट्री धारकाला दोनशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.