सांगली -ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सांगली जेल फोडो आंदोलनातील शेवटचे शिलेदार जयराम कुष्ठे यांचे रविवारी निधन झाले. ते 102 वर्षाचे होते. सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
यामुळे सांगलीतील स्वातंत्र्य सैनिकांच्या माळेतील एका हिरा निखळून पडला आहे. कुष्ठे हे मूळचे कोकणातील राजापूर तालुक्यातील जुना कोळवण गावचे सुपुत्र होते. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागासाठी सांगली जिल्ह्यात ते स्थायिक झाले होते. जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथआण्णा नायकवडी, जी.डी. लाड, वसंतदादा पाटील, हुतात्मा किसन अहिर, नामदेवराव कराडकर यांसह अनेक स्वातंत्र्य सैनिकांशी त्यांचा संपर्क आला होता.
24 जुलै 1943 रोजी सांगलीत 'जेल फोडो' घटना घडली होती. यावेळी एकूण बारा स्वातंत्र्यसैनिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यामध्ये जयराम कुष्ठे यांचाही सहभाग होता. या घटनेत आण्णासाहेब पत्रावळे आणि बबनराव जाधव हे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात शहीद झाले. जयराम कुष्टे यांच्यासह बाकी अन्य दहा जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
जयराम कुष्ठे यांनी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. याची माहिती ब्रिटिश पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्या मागावर पोलीस होते. यामुळे त्यांना भूमिगत व्हावे लागले.