सांगली - कोरोनाच्या संकटाततही जिल्ह्यात एकाच दिवशी तीन दारूचे दुकाने फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासात दारू चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तिन्ही चोरीप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली. त्यांच्यांकडून १९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत संचारबंदी असतानादेखील कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी तीन दारूची दुकाने फोडण्यात आली होती. दारूच्या बाटल्यांसह रोख रक्कम लंपास करण्यात आल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली होती. ही चोरी मिरजेतील संगम वाईन शॉप आणि अतिथी परमीटरुम बारमध्ये झाली होती.
चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने २४ तासात चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडुन १९ हजार किंमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. शौकत शेख, राजा शेख, सलीम शेख आणि इरफान शेख (रा. मिरज) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
टाळेबंदीत दारू दुकाने फोडणारे सात चोरटे 24 तासात गजाआड
कवठेमहांकाळ येथे झालेल्या किनारा परमिटरूम बिअर बार या दारू दुकानातील चोरीही कवठेमहांकाळ पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी ३ दारू चोरट्यांना अटक केली आहे. समीर सनदी, संजय पवार आणि अमोल नाईक या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
टाळेबंदीत पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेसह नागरिकांना शिस्त लावावी लागत आहे. अशी दुहेरी जबाबदारी असताना पोलिसांनी चोरट्यांना तत्काळ गजाआड केल्याने त्यांच्या कामगिरीबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी दारू दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत.