सांगली - महापालिका प्रशासनामध्ये वेगवेगळे विभाग असतात आणि या विभागाच्या माध्यमातून नागरी सुविधा पुरवण्या बरोबर शहराचा विकास साधला जातो. या सर्व विभागांचा समन्वय महत्त्वपूर्ण भाग असतो आणि सांगली महापालिका प्रशासनाकडून शहराचा विकास साधताना प्रत्येक विभागाशी समन्वय साधला जात आहे.
28 वेगवेगळे विभाग कार्यरत
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ही गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. जवळपास पाच लाख इतकी लोकसंख्या या महापालिका क्षेत्रात आहे. शहर, उपनगर आणि गुंठेवारी अशी पालिका क्षेत्राची वर्गवारी आहे आणि शहरांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी सुमारे 28 वेगवेगळे विभाग कार्यरत आहेत. पाणी पुरवठा, बांधकाम, आरोग्य, घरपट्टी, नगर रचना असे अनेक महत्वाचे विभाग आहेत आणि या विभागाद्वारे नागरी सुविधा पुरविण्याबरोबरच शहराचा विकास साधण्यात येत आहे.
सांगली महापालिका उपायुक्त राहुल रोकडे बोलताना... स्वतंत्र अधिकारी आणि वेळोवेळी बैठका सांगली महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांच्याशी या समन्वयाच्या बाबतीत संवाद साधला असता ते म्हणाले, सांगली महापालिका शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरी सुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अनेक विभाग आणि प्रभाग समित्या कार्यरत आहेत आणि प्रत्येक विभागात अधीक्षक दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत. प्रत्येक विभागाचे रोजचे अपडेट घेतले जाते. शिवाय आयुक्त स्वतः सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधतात. याशिवाय वेळोवेळी वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून बैठकीद्वारे आढावा घेतला जातो.
प्रभाग समितीसाठी सहाय्यक आयुक्त कार्यरत
याव्यतिरिक्त प्रशासकीय सोयीसाठी तिन्ही शहरात मिळून चार प्रभाग समित्या अस्तित्वता असून त्यासाठी सहाय्यक आयुक्त यांची नेमणूक आहे. त्याद्वारे नागरिक, नगरसेवक आणि महापौर असे सर्व जण नागरी सुविधा बाबत मागणी करत असतात आणि ती पूर्ण केली जाते.
अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठका
याच्या व्यतिरिक्त या सर्व विभागातल्या अधिकाऱ्यांच्यामध्ये समन्वयासाठी वेळोवेळी बैठका घेतल्या जातात. ज्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांवर तोडगा काढला जातो आणि समन्वय आणि सहकार्य या भूमिकेतून शहराच्या विकासासाठी काम केले जाते, असे उपायुक्त राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले.
सुविधांसाठी इतर थकबाकी निरंक अट
काही वर्षापर्यंत शहरात नळपाणी कनेक्शन, पाणी पट्टी वसुली आणि थकीत घरपट्टीचा मोठा प्रश्न पालिकेसमोर असायचे. मात्र पालिकेकडून आता या विभागाच्या समन्वयातून हे सर्व काम केले जाते. जसे एखाद्या नागरिकाला जर पाणी कनेक्शन हवे असेल तर त्याला आधी घरपट्टी पूर्ण भरल्याची पावती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर ज्या लोकांची घरपट्टी थकीत असेल तर नागरीकाचे पाणी कनेक्शन कट करणे किंवा बांधकाम परवान्यासाठी पालिकेचे थकबाकी निरंक अट, अशा उपाययोजना त्या-त्या विभागाच्या समन्वयातुन साधले जात आहेत. त्यामुळे आता पालिकेच्या 'कर'मध्ये वाढ झाली आहे.
समन्वय बैठकांमुळे शहराचा विकास
आज सांगली महापालिकेत 28 वेगवेगळे विभाग आहेत. त्यासाठी स्वतंत्र अधिकारीही कार्यरत आहेत आणि पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी बैठका घेतल्या जातात. त्यामुळे सर्व विभागात समन्वय कायम आहे. त्यामुळे शहाराचा विकास साधला जात आहे.