सांगली -कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 54.6 फुटावर आली असून सध्या पावसाने उसंत घेतल्याचे दिसत आहे. रविवारी पुन्हा एनडीआरएफ आणि आर्मीचे जवान रेस्क्यू ऑपरेशन सुरू करणार आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सांगली, कोल्हापूरमध्ये एकूण ८५ तुकड्या कार्यरत आहेत.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार १० ऑगस्टपर्यंत, एनडीआरएफ / एसडीआरएफ / टेरिटोरियल आर्मी / नेव्ही / एनजीओ आणि जिल्हा प्रशासन अंतर्गत कार्यरत संघ, नौका आणि कर्मचारी यांची संख्या खालीलप्रमाणे आहे ;
जिल्हा | तुकड्या | बोटींची संख्या | जवान / व्यक्ती |
सांगली | ३७ | ९५ | ५६९ |
कोल्हापूर | ४८ | ७४ | ४५६ |
सांगलीत कृष्णा, वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पाणी पात्राबाहेर पडले. याचा फटका सांगली शहरासह मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा तालुक्यातील नदीकाठच्या लोकांना बसला. प्रशासकीय यंत्रणा पूरग्रस्तांच्या मदत आणि बचावासाठी तीन दिवस तोकड्या साधनानिशी प्रयत्नशील होती. मात्र शुक्रवारपासून या मदत कार्याला वेग आला आहे.