सांगली- राज्यामध्ये बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे पाणी, खतांचा अवास्तव वापर होऊन जमीन नापीक होण्याचा धोका संभवतो. पंरतु, यावर सांगलीच्या शरद पाटील या संशोधकाने अफलातून उपाय शोधला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या संसाधनांची बचत करण्यास मदत करणारे फोलडॅक नावाचे संगणकीय स्वयंचलित यंत्राची पाटील यांनी निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे योग्य प्रमाणात पाणी सोडून ६० टक्के पाण्याची बचतही होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अत्याधुनिक फोलडॅक यंत्रणेचे फायदे इस्राईल टेक्नॉलॉजीच्या पुढील टेक्नॉलॉजी या यंत्रामध्ये असल्याचा दावा शरद पाटील यांनी केला आहे. शरद पाटील हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी एम. फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांचा शेती करताना होणाऱ्या भरमसाठ खर्चावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रांना बरोबर घेऊन संशोधन सुरू केले होते. गेल्या ३ वर्षांपासून ते यावर काम करत होते. अखेर त्यांना यामध्ये यश प्राप्त झाले आहे.
फोलडॅक नावाची स्वयंचलित मशीन पाटील यांनी तयार केली आहे. जमिनीची क्षारता (ईसी) आणि सामू (पीएच) याचा आधार घेत हे यंत्र काम करते. शेती करताना नुसते खते पाणी नाही तर, अनेक घटक उत्पादनावर परिणाम करत असतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे या यंत्राद्वारे शक्य होत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
कोल्हापूरच्या पट्टणकोडोली येथील गौरव मगदूम हे यंदा आधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यांनी आपल्या १२ एकर ऊस शेतीचे नियोजन करण्यासाठी शरद पाटील यांनी बनवलेली फोलडॅक यंत्रणा बसवली आहे. कमी जागेत शेताच्या एका खोलीत मगदूम यांनी ही स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. यामुळे मगदूम यांचे पाणी, मजूर, खत यांची बचत झाली आहे. शिवाय मगदूम यांचा खोडवा ऊस पाणी आणि खतांचा योग्य मात्रा मिळाल्याने चांगला वाढला आहे. दरवर्षी ४० ते ५० टन एकरी उत्पादन होते, मात्र यंदा ऊसाची वाढ पाहता ७० ते ८० टन उत्पादन होईल असा विश्वास मगदूम यांनी व्यक्त केला आहे.
काय करते मशीन.....
- मशिन पिकाला नेमके किती पाणी आणि खत पाहिजे हे सांगते. त्यानुसार पिकाला पाणी दिले जाते.
- योग्य मात्रा सांगुन खते आणि पाण्याची बचत करण्यास मदत.
- हवामानाचा अंदाज.
- ड्रोन मॅपिंग सुविधेद्वारे गरज असेल तेथे फवारणी करता येते.
- पिकांवरील रोग निदान करता येते.
- जमिनीची आद्रता.
- पिकाच्या पानांचे बाष्पीभवन