सांगली -जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तक्रारदार, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली आहे. तसेच ही तक्रार आणि इतर पुरावे घेऊन किरीट सोमैया यांची भेट घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळयाबाबत सांगलीला भेट देण्याची मागणी करणार असल्याचे फराटे यांनी स्पष्ट केले आहे.
थेट पंतप्रधानांकडे तक्रार -
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या तक्रारीबाबत नुकतेचे राज्य सहकार विभागाने चौकशीचे आदेश दिले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक व शिराळ्याचे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आणि स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र चौकशी सुरू असताना सहकार विभागाकडून अचानक या चौकशीला स्थगिती देण्यात आली. मात्र राजकीय दबावातून या चौकशीचे फार्स करण्यात आला आणि पुन्हा त्याला स्थगिती देण्यात आली, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील सराटे यांनी करत बँकेतल्या घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे.
बँकेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे सुनील फराटे यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाकडूनही तातडीने घेण्यात आली आहे आणि संबंधित तक्रारीच्या चौकशीसाठी एका अधिकार्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष व तक्रारदार सुनील सराटे यांनी दिली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाखल करण्यात आलेली तक्रार आणि बँकेच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत असणारे पुरावे घेऊन आपण भाजपचे नेते किरीट सोमैया यांची लवकरच भेट घेऊन, बँकेच्या कारभाराचा त्यांच्यासमोर पंचनामा करून या प्रकरणी ईडी चौकशी बाबतीत मागणी करणार आहे. तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पाहणी करण्यासाठी किरीट सोमैया यांना आपण सांगलीला येण्याची विनंती करणार असल्याचे फराटे यांनी सांगितले.