सांगली - मिरजेच्या ‘मिशन हॉस्पिटल’मधून सकाळपासून एक कोरोना रुग्ण बेपत्ता असल्याचे समजल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास हा वयोवृध्द कोरोना रुग्ण रुग्णालयाच्या एका खोलीत आढळून आला आणि काही वेळातच त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे मिशन हॉस्पिटलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अनेक खासगी रुग्णालयात कोरोना सेंटर निर्माण करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मिरजेतील वॉनलेस चेस्ट (मिशन) हॉस्पिटल या ठिकाणीही कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात उपचार घेणारा एक 88 वर्षीय वयोवृद्ध कोरोना रुग्ण पहाटेपासून बेपत्ता होता. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी सकाळी चौकशी केली असता रुग्णालय प्रशासनाकडून रुग्ण गायब असल्याचे सांगितले होते. त्यांनतर एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे रुग्णालय आणि जिल्हा प्रशासन हादरून गेले होते.
त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून संपूर्ण रुग्णालयामध्ये शोध घेण्यात आला. नातेवाईकांनी इतर ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र 88 वर्षीय वयोवृद्ध कुठे आणि कसे जाणार हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न निर्माण झाला.