सांगली - भाजपकडून गड राखला जाणार की? काँग्रेसच्या हातातून गेलेला गड स्वाभिमानी परत मिळवून देणार? की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार याबाबत सांगलीत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. ७० वर्षे काँग्रेस आणि ३५ वर्षे वसंतदादा पाटील यांच्या हातात सांगली लोकसभा मतदारसंघ राहिला आहे. मात्र, २०१४ मधील निवडणुकीत मोदी लाटेत सांगलीत काँग्रेसच्या बालेकिल्याला सुरुंग लावत भाजपचे संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला. त्यावेळी काँग्रेसच्या प्रतीक पाटलांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी या निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. मात्र, तरीही काँग्रेसचा गड कोणालाही शाबूत ठेवता आला नाही.
यावेळी या मतदारसंघातून पुन्हा भाजपने संजयकाका पाटील यांना तर आघाडीकडून स्वाभिमानीतर्फे विशाल पाटील हे मैदानात उतरलेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर उभे राहिल्याने विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यासमोर आव्हानं निर्माण झाले आहे.
गेल्या पाच वर्षात सांगली लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात अनेक राजकीय बदल घडले आहेत. काँग्रेस आणि भाजपतील संघर्ष दोन्ही पक्षातील नेत्यांनी चव्हाट्यावर आणत विरोधी पक्षाबरोबर वैरत्व घेण्याऐवजी स्वकीयांचे शत्रूत्व घेतले आहे. याचा फटका भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याबरोबर काँग्रेसमधील वसंतदादा घराण्याला बसला आहे.
२०१४ ची परिस्थिती
२०१४ च्या निवडणुकीत २ वेळा सांगली लोकसभेचे नेतृत्व केलेल्या वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा भाजपच्या संजयकाका पाटील यांनी तब्बल २ लाख ३८ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीच्या विजयाचे परिणाम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावरही झाले. ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात ३ भाजप आणि १ शिवसेनेचे आमदार विजयी झाले. भाजपच्या या विजयी घौडदौडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस जवळपास संपुष्टात आल्याप्रमाणे झाली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रतीक पाटील यांनी मतदारसंघाशी असणारा सर्व संपर्क तोडून अघोषित संन्यास घेतला.
काँग्रेसमधील अंतर्गत कलह
काँग्रेसमध्ये सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून बराच कलह झाला होता. प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमधील वसंतदादा विरुद्ध पतंगराव कदम गटातील संघर्ष उघड झाला. या संघर्षामुळे गेली ७० वर्षे आणि त्यातील ३५ वर्षे एकहाती सांगली लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवणाऱ्या दादा घराण्याचा पत्ता कट झाला. काँग्रेसने सांगलीची जागा मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला दिली.
पक्षातील नेत्यांनी थेट वरिष्ठ पातळीवर संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती. अखेर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ऐनवेळी संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण यातून पक्षातील एकेकाळचे स्टार प्रचारक व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बंड केले. तर काँग्रेस आणि पर्यायाने वसंतदादा पाटील घराण्यातून सांगली लोकसभेची उमेदवारी गेल्याने वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला. मात्र, स्वाभिमानीने विशाल पाटील यांना पक्षाची उमेदवारी देत लोकसभेच्या मैदानात उतरवले.
गोपीचंद पडळकरांचे बंड
भाजपचे बंडखोर मानले जाणारे गोपीचंद पडळकर यांना स्वाभिमानीतून उमेदवारी निश्चित मानली जात असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमधून संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला.
१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस महाआघाडीचे स्वाभिमानी शेतकरी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, अपक्ष असे १२ जण निवडणूक लढवत आहेत. मात्र, यामध्ये भाजप, काँग्रेस महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यात खरी लढत होत आहे. या तिरंगी लढतीमुळे सांगली मतदारसंघात रंगत आली आहे.