सांगली- जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी सांगली भाजपकडून करण्यात आली आहे. सांगलीत काढण्यात आलेल्या एनआरसी व सीएए कायद्याविरोधात निघालेल्या मोर्चा दरम्यान चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी भाजपने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रारवजा निवेदन दिले आहे.
सांगलीत 25 जानेवारी रोजी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या #NRC व #CAA कायद्याविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम सहभागी झाले होते. यावेळी आयोजित सभेत मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी बोलताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर देशाची फाळणी करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करत संसदेत मंजूर करून कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप सांगली भाजपकडून करण्यात आला आहे.