महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीतील 'त्या' मृताला कोरोना झालाच नव्हता, चुकून कोरोना यादीत नाव - corona sangali update

सांगलीच्या खेराडी वांगी येथील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे मुंबईच्या सायन रुग्णालयाकडून कळवण्यात आले होते. मात्र, आता या रुग्णालयाकडूनच सदर व्यक्तीला कोरोना झाला नव्हता, असा खुलासा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

सांगली
सांगली

By

Published : Apr 30, 2020, 5:00 PM IST

सांगली- अंत्यसंस्कारानंतर संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचे सांगली जिल्ह्यात उघडकीस आले आहे. सांगलीच्या खेराडी वांगी येथील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे मुंबईच्या सायन रुग्णालयाकडून कळवण्यात आले होते. मात्र, आता या रुग्णालयाकडूनच सदर व्यक्तीला कोरोना झाला नव्हता, असा खुलासा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

मुंबईत राहणाऱ्या सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी येथील एका व्यक्तीचा १८ एप्रिल रोजी मुंबईच्या सायन रुग्णालयामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर संबंधित कुटुंबाने १९ एप्रिल रोजी मूळ गावी खेराडे वांगी येथे मृतदेह आणत अंत्यसंस्कार विधी पार पाडला. या अंत्यसंस्काराला कुटुंबासह ३० जण उपस्थित होते. त्यानंतर २२ एप्रिलला सायन रुग्णालयाकडून मृत व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि संबंधित कुटुंब आणि खेराडे वांगीचे ग्रामस्थ पुरते हादरून गेले होते. धक्कादायक असणाऱ्या या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत खेराडे वांगी हे गाव सील केले. तसेच मृत व्यक्तीच्या संबंधित असणारे कुटुंब आणि अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या ३६ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. आणि त्यांचे स्वॅबचे नमुनेही घेण्यात आले होते. मात्र, या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला. मात्र, संबंधित मृत व्यक्तीच्या कोरोना अहवालावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. 'स्वॅब' घेतला असताना अहवाल येण्याआधी मृतदेह दिला कसा? हा प्रश्न उपस्थित करत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी चौकशीची मागणी केली होती.

सांगली जिल्हा प्रशासनाकडूनही सायन रुग्णालयाला मृत व्यक्तीच्या मृत्यूबाबत खुलासा करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने रुग्णालयाकडून खुलासा अहवाल जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री प्राप्त झाला. त्यामध्ये या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनाने झालेला नाही, असे नमूद करण्यात आल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.

तरीही जिल्हा प्रशासनाने याबाबतची अधिकची खबरदारी म्हणून मृत व्यक्तीच्या संबंधित ज्या ३६ निकटवर्तीयांना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवले आहे, त्या व्यक्तींचा ३० एप्रिल रोजी सात दिवसाचा क्वारंटाईन कालावधी होत असल्याने, त्यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीनंतर अहवाल आल्यावर या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे की, गृह विलगीकरणात ठेवावे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details