सांगली -एकेकाळचे भाजपचे सांगलीचे माजी आमदार व भाजपवर नाराज असलेल्या पैलवान संभाजी पवारांची नाराजी अखेर दूर करण्यात भाजपला यश आले आहे. रविवारी पै. संभाजी पवारांनी सांगली लोकसभेच्या निवडणुकीत संजयकाका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने संभाजी पवार गहिवरून गेले होते. तर २१ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संभाजी पवार हे भाजपत कमबॅक करणार आहेत.
रविवारी सांगलीमध्ये पवार यांच्या घरी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांची नाराजी दूर केली आहे. पैलवान संभाजी आप्पा पवार यांची मनधरणी करण्यात भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यश आले आहे. आज सांगलीमध्ये पवार यांच्या घरी भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुधीर गाडगीळ आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांची नाराजी दूर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवार गटाची नाराजी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवार गटाची भेट घेऊन नाराजी संपवली होती. तर संजयकाका पाटील यांच्या बाबतीत असणारी नाराजीही दूर होऊन पवार गटाने सांगली मतदारसंघात संजयकाका पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. तसेच भाजपचा प्रचार करणार असल्याचे पवार गटाकडून सांगण्यात आले. तर २१ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संभाजी पवार यांचे भाजपत पुनरागमन होणार असल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले आहे. तर यावेळी हाळवणकर आणि संभाजी पवारांचे सूपुत्र पृथ्वीराज पवार यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे आणि संभाजी पवारांच्या आठवणीना उजाळा देताच संभाजी पवार यांना गहिवरून आले.
काय होती नेमकी पवार गटाची नाराजी..
संभाजी पवार यांच्या रुपाने खरे तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा राजकीय उदय झाला होता. पवारांची भाजपची एन्ट्री ही गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचंड जनसमुदायाच्या हजेरीत झाली होती. आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत संभाजी पवार यांच्या रुपाने पश्चिम महाराष्ट्रात भाजपला पहिला आमदार मिळाला होता. त्यांना भाजपात आणण्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे पवार गटाचा मुंडे यांच्यावर मोठा विश्वास होता.
२०१४ च्या सांगली लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या संजयकाका पाटील यांनी उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे संभाजी पवार हे पक्षावर नाराज होते. याबाबतीत पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. कारण, संजयकाका पाटील हे राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांचे कट्टर समर्थक होते. जयंतराव पाटील आणि संभाजी पवार यांचे सर्वोदय साखर कारखाण्याच्या मालकी हक्कावरून टोकाचा संघर्ष होता. त्यामुळे पवार गट नेहमी जयंत पाटलांच्या समर्थकांना आपला शत्रू मानत राहिले.
पवार गटाने २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता आणि संजयकाका पाटील यांना विरोध केला होता. याच विरोधातून २०१४ मध्ये सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेकडेही पवार आणि त्यांच्या गटाने पाठ फिरवली होती. यातून पक्षीय पातळीवर संभाजी पवार यांच्यावर नाराजीची स्थिती निर्माण होऊन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार असतानाही संभाजी पवार यांना उमेदवारी डावलण्यात आली आणि पवार गटाने थेट शिवसेनेची वाट धरली होती.
मात्र, आता गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकीय पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. तर दुसरीकडे जयंतराव पाटील यांच्या विरोधात असणाऱ्या राजू शेट्टी आणि वसंतदादा पाटील गटाला पवारांनी अनेक वेळा राजकीय रसद पुरवली होती. मात्र, या निवडणुकीत शेट्टी आणि दादा घराणे हे जयंतराव पाटील यांच्या वळचणीला गेल्याने पवार गटानेही भाजपच्या मदतीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील आणि पर्यायाने भाजपची ताकद वाढणार आहे, हे मात्र नक्की.