सांगली- केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत जाहीर केलेली आहे. साखरेचा आधारभूत किमंत जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळाली पाहिजे. अन्यथा एकाही कारखान्याचे धुरांडे पेटवू देणार नाही, असा इशारा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. ते सांगली येथे पत्रकारांशी बोलत होते.
केंद्र सरकारने नुकताच साखरेचा हमीभाव जाहीर केला आहे. प्रति किलो 32 रुपये साखरेला आधारभूत किंमत केंद्र सरकारने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
साखर कारखानदारांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून एक रकमी एफआरपी मिळण्यावरुन मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एक रकमी एफआरपी मिळवण्यासाठी शेतकरी संघटनांकडून दरवर्षी साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहे, असे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले आहे. तसेच गेल्या पाच वर्षात भाजपच्याकडून राज्यात साखर कारखानदारांच्यावर कारवाईचा बडगा सुद्धा उगारण्यात आला होता,त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरात एफआरपी पडली होती, असेही त्यांनी सांगितले.
आता केंद्राने साखरेची आधारभूत किंमत ठरवल्याने या पुढील काळात शेतकऱ्यांना देण्यात कसली अडचण निर्माण होण्याचा प्रश्न नाही, सध्या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांचे सर्वाधिक साखर कारखाने आहेत. त्यामुळे आता शंभर टक्के शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्यात काहीच अडचण नाही. जर साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केले नाही तर राज्यातला एकाही साखर कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही, शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरु ,असा इशारा माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.